नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वेशीवरच असलेल्या नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन काही दिवसांतच होणार आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई विमानतळ प्राधिकारणाबरोबरच नवी मुंबई महापालिकेनेही विमानतळाच्या उद्घाटनानंतर तात्काळ या परिसरातून नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या बसेसचे परिचालन सुरू करण्याची प्राथमिक तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या परिवहन विभागाने १५० नवीन सीएनजी गाड्या खरेदीची निविदा प्रसिध्द केली आहे. विमानतळाचे उद्घाटन होताच पहिल्या टप्प्यात २० बसेसचे परिचालन सुरू करण्याची तयारी असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

नवी मुंबई विमानतळ हे पनवेल महापालिकेच्या हद्दीत येत असले तरी नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीपासूनही ते लागून आहे. त्यामुळे विमानतळापर्यंत जाण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने तयारी सुरू केली आहे. पनवेल महापालिकेची स्वताःची परिवहन सेवा नसल्याने पनवेल महापालिकेच्या परिवहन सेवेसाठीची संपूर्ण मदार नवी मुंबई महापालिकेवरच अवलंबून आहे. नवी मुंबईकर प्रवाशांना समाधानकारक सेवा पुरविणारा उपक्रम म्हणून नवी मुंबईकरांची व पनवेलकरांची नेहमीच एनएमएमटी प्रवासाला पसंती लाभली आहे. पालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात सध्या जवळजवळ ३५० गाड्या सेवेत आहे आणि आता पालिका नव्याने १५० सीएनजी बस खरेदी करणार आहे. बसखरेदीचा प्रस्तावही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

नवी मुंबई विमानतळापासून नवी मुंबई महापालिकेची हद्द काही मिनिटावर आहे. त्यामुळे विमानतळ सुरू होताच विमानतळ ते रेल्वेस्थानकांशी जोडण्यासाठी पालिका परिवहन उपक्रम तयारी करत आहे. एकीकडे विमानतळापासून लगतच असलेल्या रेल्वे मार्गाबरोबरच हार्बर रेल्वेपर्यंतच्या स्थानकापर्यंत सेवा सुरू करण्याबाबतची पूर्वतयारी पालिका परिवहन उपक्रमाने सुरू केली आहे.

पालिका परिवहन उपक्रमामार्फत नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत व हद्दीबाहेर मुंबई, बोरिवली, ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, खोपोली, कर्जत, रसायनी आणि उरण या भागात अनेक सर्वसाधारण तसेच वातानुकूलित अशा प्रवासी सेवा देण्यात येतात. सर्वांचे लक्ष लागलेले व उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या नवी मुंबई विमानतळामुळे मोठ्या प्रमाणात या भागाचा झपाट्याने विकास होत असताना नागरिकांना विमानतळापर्यंत वाहतुकीची सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने तयारी सुरू केली आहे. विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रत्यक्षात प्रवासी सेवा सुरू होण्यापूर्वीच पालिकेने या परिसरातून पालिका परिवहन सेवा सुरू करण्याची प्राथमिक तयारी केली आहे.

बससेवेची मदार नवी मुंबई पालिकेवर

पनवेल महापालिकेला अद्याप स्वताःचा परिवहन उपक्रम सुरू करता आला नसून त्यांची संपूर्ण मदार नवी मुंबई महापालिकेच्या उपक्रमावरच अवलंबून आहे.त्यामुळे नव्या विमानतळाच्या उद्घाटनानंतर विमानतळापासून प्रवासी वाहतुकीसाठी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचाच पर्याय उपलब्ध राहणार आहे. नवी मुंबई महापालिकेने तशा दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

नवी मुंबई महापालिका नव्या विमानतळाच्या पार्श्वभूमीवर बससेवा देण्याच्या दृष्टीने पालिकेने तयारी सुरू केली आहे. पालिका परिवहन प्रशासनाने १५० सीएनजी बसखरेदीबाबतची निविदा प्रसिद्ध केली आहे. तसेच आणखी १०० बससेवा खरेदीबाबतची धोरणात्मक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पालिका परिवहन उपक्रम विमानतळ प्राधिकारणाशी चर्चा करून पहिल्या टप्प्यात २० बससेवा सुरू करण्याचे प्रयोजन आहे.- योगेश कडुस्कर, पालिका परिवहन व्यवस्थापक, नवी मुंबई महापालिका