नवी मुंबई : वाहनांच्या वाढत्या भारामुळे गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगर प्रदेशातील वर्दळीच्या मार्गांमध्ये गणला जाणाऱ्या ठाणे-बेलापूर रस्त्यावरील तीन नव्या उड्डाणपुलांच्या खर्चाचा अर्धा भार महाराष्ट्र राज्य अैाद्योगिक विकास महामंडळाने उचलावा अशा स्वरुपाचा प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेने महामंडळाला सादर केला आहे. नव्या पुलांसाठी ४०० कोटी रुपयांची तजवीज महामंडळाने करावी अशी मागणी महापालिकेने केली आहे.
एमआयडीसीने अंगिकारलेल्या नव्या धोरणानुसार ठाणे-बेलापूर अैाद्योगिक क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर नागरी संकुलांची उभारणी सुरू झाली आहे. एमआयडीसी पट्ट्यातील या नागरी आणि व्यावसायिक संकुलांचा मोठा भार ठाणे-बेलापूर रस्त्यावर येणार आहे. तसेच तुर्भे ते दिघा-ऐरोली दरम्यान उभारण्यात आलेल्या ठाणे-बेलापूर मार्गावर गेल्या काही वर्षात वाहनांचा भार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ठाणे-बेलापूर अैाद्योगिक पट्ट्यास लागून हा मार्ग असल्याने या भागातील वाहनांचा मोठा भार या रस्त्यावर येत असतोच. शिवाय ठाणे-वाशी-पनवेल, मुंबईतील पूर्व मार्गावरील उपनगरे, पुणे, गोवा या दिशेने जाणाऱ्या नागरिकांसाठी देखील हा महत्त्वाचा रस्ता आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यामुळे येत्या काही वर्षांत या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्ग अधिक वर्दळीचा होईल हे स्पष्ट आहे. उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरात येणाऱ्या अवजड वाहतुकीचा भारही सद्यस्थितीत या मार्गावर येत असतो. याशिवाय वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमधील अंतर्गत वाहनांमुळे हा मार्ग सतत गजबजलेला असतो.
ठाणे-बेलापूर मार्गावर पडणारा वाहनांचा हा भार लक्षात घेता नवी मुंबई महापालिकेने या मार्गावर आणखी नव्या उड्डाणपुलांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रबाळे स्थानक, वनमंत्री गणेश नाईक यांचे कार्यालय असलेल्या क्रिस्टल हाऊस ते पावणे आणि तुर्भे येथील बीएसएफ कंपनीपासून शीव-पनवेल महामार्गावर सानपाडा भागात असलेल्या शरयू हुंडाई शोरुम पर्यत असे तीन नवे उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. यासाठी महापालिकेला अंदाजे ८०० कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता हा खर्च करणे शक्य आहे. या खर्चाचा भार एमआयडीसीने उचलावा असा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे.
घरबांधणी जोरात
एमआयडीसीच्या नव्या धोरणानुसार सध्या औद्योगिक पट्टयातही घरबांधणी जोरात सुरू झाली आहे. ठाणे-बेलापूर मार्गास लागूनच असलेल्या मोठ्या अैाद्योगिक भूखंडांवर आता निवासी आणि व्यावसायिक संकुलांच्या रांगा दिसू लागल्या आहे. देशातील एका मोठ्या उद्योजकाच्या माहिती तंत्रज्ञान संकुलात आता नागरी वसाहती आणि मोठे मॅाल्स उभे राहू लागले आहेत. या वापर बदलामुळे मोठ्या एमआयडीसी भागातही मोठया प्रमाणावर लोकसंख्या वाढणार आहे. लोकसंख्या वाढीचा हा भार ठाणे-बेलापूर पट्टयावर येण्याची शक्यता आहे. एमआयडीसीच्या नव्या विस्तार धोरणामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर येणारा वाहनांचा ताण लक्षात घेता महापालिकेने हा प्रस्ताव सादर केला आहे.
नवी मुंबई विमानतळ तसेच एमआयडीसी भागाचे होणारे विस्तारीकरण लक्षात घेता ठाणे-बेलापूर मार्गावर नव्या उड्डाणपूल प्रकल्पांची आखणी आतापासूनच होणे गरजेचे आहे. एमआयडीसीत नव्याने उभी रहाणारी घरे, व्यापारी संकुलांचा मोठा भार या रस्त्यावर येणार आहे. त्यामुळे या उड्डाणपुलांचा खर्च एमआयडीसीने उचलावा असा प्रस्ताव महापालिकेने त्यांना सादर केला आहे. यासंबंधीचे एक पत्र नुकतेच एमआयडीसीला पाठविण्यात आले आहे. – डाॅ.कैलास शिंदे, आयुक्त नवी मुंबई महापालिका
