नवी मुंबई – नवी मुंबई शहरात हवामान खात्याने एकीकडे रेड अलर्ट दिला असतानाही ७ हजारहून अधिक नागरिकांच्या एकत्रित सहभागातून सायन पनवेल महामार्ग व ठाणे बेलापूर मार्गावर सखोल महास्वच्छता मोहीम यशस्वी केली. त्यामुळे स्वच्छतेविषयी बांधिलकी जपत डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या ५ हजारहून अधिक श्रीसदस्यांच्या समर्पित सेवाभावी कार्यवृत्तीचे प्रकट दर्शन झाले. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करण्यात येत आहे.
केंद्र सरकारमार्फत स्वच्छ भारत मिशनच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियान राबविण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या कालावधीत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक दिवशी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. असाच स्वच्छता विषयक मोठा उपक्रम आज रविवारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सायन पनवेल महामार्ग आणि ठाणे बेलापूर मार्ग या शहरातील दोन महत्वाच्या मुख्य मार्गांवर सखोल महास्वच्छता मोहीमेच्या स्वरूपात राबविण्यात आला. मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस पडत असूनही सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेल्या या सखोल महास्वच्छता मोहीमेत ७ हजाराहून अधिक स्वच्छताप्रेमी नागरिक, महापालिका अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत शहर स्वच्छतेविषयीची आपली बांधिलकी दाखवून दिली.
विशेष म्हणजे या सखोल महास्वच्छता मोहीमेत डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, अलिबाग यांचे ५ हजारहून अधिक श्रीसदस्य हे पद्मश्री, महाराष्ट्रभूषण डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या महामार्ग सखोल स्वच्छता महामोहीमेत सक्रिय सहभागी झाले होते.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्यासह उरणफाटा येथे स्वच्छता कार्यात सहभागी होण्यासाठी उपस्थित असलेले घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ.अजय गडदे, बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त डॉ.अमोल पालवे तसेचमोठ्या संख्येने उपस्थित श्रीसदस्य व नागरिकांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण करून मोहीमेस सकाळी ७ वा. सुरूवात झाली.
सखोल स्वच्छता महामोहीमेचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य यांना महामार्गावरील क्षेत्र वाटप करून देण्यात आले होते. वाशी, तुर्भे व सानपाडा, जुईनगर, नेरूळ, बेलापूर या विभाग कार्यालयांच्या हद्दीत येणा-या सायन पनवेल महामार्गाच्या स्वच्छता मोहीमेत तसेच तुर्भे ते दिघा या ठाणे बेलापूर मार्गाच्या स्वच्छता मोहीमेत ठराविक अंतराचे क्षेत्र श्रीसदस्यांच्या गटांना स्वच्छतेसाठी वाटप करून देण्यात आले होते. त्यामुळे अत्यंत नियोजनबध्दरित्या शिस्तीत ही मोहीम राबविण्यात आली. श्रीसदस्यांसोबत त्या त्या विभागांच्या हद्दीतील नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य, एनएसएसचे विद्यार्थी हे महापालिका अधिकारी-कर्मचारी, स्वच्छतामित्र यांच्यासह उत्स्फुर्तपणे आपापल्या विभागात सहभागी झाले.
डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्यांची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद..
हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित केलेला असतानाही नियोजित वेळेत सकाळी सात वाजता श्रीसदस्य निश्चित ठरवून दिलेल्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन भर पावसात आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे.