नवी मुंबई – नवी मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून नशामुक्तीसाठी पोलीस दल सातत्याने कारवाई करत असल्याने गेल्या ३२ महिन्यात १८३१ गुन्हे दाखल करून २,८५४ गुन्हेगारांना पकडण्यात आले. या धरपकडीत ७० कोटी १८ लाखांचा मुद्देमाल पोलीस दलाने जप्त केला. वारंवार जप्त केलेले अमली पदार्थ हे शास्त्रोक्तपद्धतीने तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीतील भस्मीकरणा-या यंत्रात जाळून त्याची होळी केली जाते.
अशाच पद्धतीचा कार्यक्रम शक्रवारी नवी मुंबई पोलीस दलाने आयोजित केला. या कार्यक्रमात २६ कोटी ४८ लाखांचा अमली पदार्थांचा साठा भस्मीकरण यंत्रात टाकून तो साठा खाक करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या आ. मंदा म्हात्रे, नवी मुंबई पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त संजय येनपूरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, मुंबई वेस्ट मॅनेजमेंटचे संचालक सोमनाथ मालघर हे उपस्थित होते.
नवी मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या कारकिर्दीत गेल्या अडीच वर्षांपेक्षाच्या अधिकच्या काळात नशामुक्ती नवी मुंबई अभियान सर्वच पोलीस दलाने हाती घेऊन त्यावर कठोर अमलबजावणी केली. दोन वर्षात आतापर्यंत ३८ कोटी रुपयांचा अमलीपदार्थाचा साठा जप्त करून तो साठा तळोजा येथील भस्मीकरण यंत्रात जाळून होळी कऱण्यात आली. याच कारवाईचा भाग म्हणून शुक्रवारी २६ कोटी ४८ लाख रुपयांचे अमलीपदार्थ तळोजा येथील रामकी ग्रुपच्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या भस्मीकरण यंत्रात टाकण्यात आले. ही कारवाई भाजपचे आ. प्रशांत ठाकूर, महेश बालदी, मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पाडली.
यावेळी नवी मुंबई पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे व इतर पोलीस अधिकारी आणि रामकी कंपनीचे व्यवस्थापक सोमनाथ मालघर हे उपस्थित होते. गेल्या अडीच वर्षांच्या काळात अमली पदार्थाच्या तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये १०१ आफ्रिकन नागरीकांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडुन ४० कोटी रुपयांचा अंमली पदार्थाचा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच नवी मुंबई मध्ये अवैधरित्या राहत असलेल्या आफ्रिकन नागरीकांवरील कारवाईत २०३४ आफ्रिकन नागरीकांना भारत देशातुन हद्दपार करुन त्यांना परत त्यांच्या देशात पाठविले आहे. त्यापैकी ९८९ आफ्रिकन नागरीकांची नावे पारपत्र विभागाव्दारे काळ्या यादीत टाकण्यात आली आहेत.
अमली पदार्थाची तस्करी करणा-यांवर कठोर कारवाई
अमली पदार्थाचा तस्करीचा व्यवसाय करणा-या ७ आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात अंमली पदार्थ व्यवसाय करणा-या सराईत गुन्हेगारांवर अवैध अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थांच्या वाहतुकीस प्रतिबंधक कायद्यानूसार कारवाई करण्याचे ३ वेगवेगळे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीकरीता पाठविण्यात आल्याची माहिती या कार्यक्रमावेळी सह पोलीस आयुक्त संजय येनपूरे यांनी दिली.
अमली पदार्थाच्या अनुषंगाने पोलीसांना माहिती देण्याकरीता नागरिकांनी ८८२८ ११२ ११२ या हेल्पलाईन नंबर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणा-या नागरिकांची ओळख गोपनिय ठेवण्यात येत असल्याचे यावेळी सह पोलीस आयुक्त म्हणाले.
अमलीपदार्थामुळे देशाचे भवितव्य नशेच्या आहारी जात असताना नवी मुंबई पोलीस दलाने मागील अडीच वर्षात सातत्याने नशामुक्ती अभियान प्रत्यक्षात राबविल्यामुळे नवरात्रोत्सव दरम्यान जप्त केलेल्या २६ कोटी ४८ लाखांचा अमली पदार्थाचा साठा नष्ट करण्यात येत असल्याने मला नवी मुंबई पोलीस दलाच्या कामगिरीविषयी कौतुक करते. पोलिसांच्या या कारवाईला साथ देण्यासाठी नवी मुंबईतील नागरिक, पालक व शिक्षक वर्गाने सुद्धा पुढे येणे गरजेचे आहे. आपल्याजवळपास गैरकृत्य होत असल्यास पोलीस व लोकप्रतिनिधींना त्याची माहिती दिल्यास पोलीस तातडीने अशा अड्डा किंवा त्या व्यक्तिविरोधात कारवाई करू शकतील. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईला सामाजिक बळ मिळू शकेल. – मंदा म्हात्रे, आमदार, भाजप, बेलापूर