नवी मुंबई : पत्नी समवेत दुचाकीवर भरधाव वेगाने जाणाऱ्या व्यक्तीचे वाहना वरील नियंत्रण सुटल्याने डंपरला धडकल्याने झालेल्या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणी डंपर चालकाच्या विरोधात शुक्रवारी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना वाशी पथकर नाक्यावर घडली आहे.

एखाद्या महामार्गांवर दुचाकी अतिशय सावधपणे आणि योग्य नियंत्रित वेगाने चालवणे आवश्यक आहे. जराशी चूक जीवावर बेतू शकते. त्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभाग वा संबंधिक प्राधिकरण जागोजागी वाहतूक नियमानुसार गाडी चालवा, वेगावर नियंत्रण ठेवा, घरी कोणीतरी वाट पाहत आहे, सावकाश वाहन चालवा, नजर हटी दुर्घटना घटी अशा सूचना जागोजागी फलकावर लावलेल्या असतात. मात्र अनेकजण याकडे सपशेल दुर्लक्ष करून बेदरकार वाहन चालवतात. आणि अपघात ग्रस्त होतात. अशाच एका अपघातात नवी मुंबईतील वाशी येथे पती पत्नीचा मृत्यु झाला आहे.

रोशन वलेरियन लोबो (वय ३९) आणि त्याची पत्नी जॅन्सी रोशन लोबो ( वय ३२) असे अपघातात मृत्यू झालेल्या पती पत्नीचे नाव आहे. लोबो हे मुंबईतील साकी नाका परिसरात राहतात. गुरुवारी काही कामानिमित्त ते ठाण्यातील मुंब्रा येथे गेले होते. संध्याकाळी काम आटोपून पुन्हा नवी मुंबई मार्गे साकी नाका येथे जातं होते.

गुरुवारी रात्री साडे अकरा बाराच्या सुमारास वाशी पथकर नाक्या जवळ रोशन यांचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले आणि समोरील डंपर वर जाऊन गाडी जोरात आदळली. अपघात एवढा भीषण होता की यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांच्या कडील कागपत्रा वरून त्यांची ओळख पटली. या प्रकरणी डंपर ( एमएच ०३ बी एक्स २१ ४४) चालक रेवातलाल महतो याला ताब्यात घेण्यात आले होते.

या प्रकरणी मयत रोशन यांचा भाऊ विना मायकल लोबो यांनी दिलेल्या फिर्यादी वरून डंपर चालक महतो याच्या विरोधात बेदरकार आणि निष्कळजी पणे गाडी चालवल्याने दोघांच्या मृत्यूस कारण प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता नुसार त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी माहिती दिली आहे.