नवी मुंबई : वाशी येथील ठाणे खाडीवर मुंबई-पुणे, पुणे-मुंबई अशा दोन्ही दिशांना दोन नवीन बहुचर्चित उड्डाणपूल तयार करण्यात आले आहेत. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या पुलाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. वाशीकडून मुंबईकडे येणाऱ्या तिसऱ्या पुलाचेही काम पूर्ण झाले असून लवकरच मान्यवरांच्या हस्ते या पुलाचेही उद्घाटन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारपासून मुंबईकडून येणारी वाहतूक सरळ नव्या पुलावरून पुण्याच्या दिशेने वेगात सुरू झाल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाशी खाडी पुलावरील सततच्या वाहतूककोंडीला त्रासलेल्या वाहनचालकांची लवकरच दोन्ही दिशेला होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याची माहिती मानखुर्द व नवी मुंबई वाहतूक विभागाने दिली आहे. अटलसेतू झाल्यानंतर वाशी उड्डाणपुलावरील ताण काहीसा कमी झाला होता. तसेच उरण, पनवेलची वाहतूक अटल सेतूवरुन जात होती.परंतू महाराष्ट्र शासनाच्या टोलमाफीनंतर अटल सेतूवरुन मुंबईला दररोज जाणाऱ्या १० ते १२ हजार गाड्यांची वाहतूक पुन्हा वाशीखाडीपुल मार्गाने होत असल्याने व तिसऱ्या खाडीपुलाच्या कामामुळे वाशी खाडीपुलावर सतत वाहतूककोंडीचा सामना करावा लागला होता. परंतु आता तिसऱ्या उड्डाणपुलाचे दोन्ही दिशेकडील काम पूर्ण झाले असल्याने उड्डाणपुलावरील वाहतूक वेगवान होणार आहे.

५९८ कोटी खर्चातून तिसरा उड्डाणपूल

नवी मुंबई , मुंबईला जोडणारा पहिला खाडीपूल १९७१ तर दुसरा खाडी पूल १९९५ मध्ये सुरू करण्यात आला होता. तर आता ५९८ कोटी खर्चातून तयार झालेला तिसरा खाडीपूल पूर्णत्वास आला आहे. वाशी मुंबई व मुंबई वाशी वाहतुकीसाठी दोन उड्डाणपुलावर प्रत्येकी ६ लेन उपलब्ध झाल्या आहेत. १९७१ साली तयार करण्यात आलेला पुणे – मुंबईला जोडणारा पहिला उड्डाणपूल वाहतुकीसाठी कायमचा बंद केला आहे. तर वाशीकडून मुंबईकडे जाणारा ३ लेनचा लवकरात लवकर सुरू व्हावा अशी अपेक्षा वाहनचालक करत आहेत.

मानखुर्दहून वाशीकडे जाणाऱ्या मार्गाचे काम पूर्ण झाले असून मंगळवारपासून नव्या पुलावरुन वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे पुण्याकडे जाताना पुलावर वाहतूक कोंडी होत नसल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईकडे येणाऱ्या नव्या उड्डाणपुलाचेही पुढील काही दिवसांतच उद्घाटन होणार आहे.मंगेश शिंदे, मुख्य वाहतूक निरीक्षक, मानखुर्द

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New flyover from vashi to mumbai awaiting for opening zws