नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम असलेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. मार्चअखेर असल्याने अद्याप मनपाकडून अनुदान प्राप्त झाले नाही असे कारण सांगितले जात आहे. मात्र अर्धा महिना उलटून गेला तरी पगार हाती न पडल्याने कर्मचाऱ्यांना दैनंदिन खर्च भागविताना नाकीनऊ येत आहेत. तसेच विविध कर्जांचे हप्ते थकले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई परिवहन सेवेत सुमारे ३ हजार २०० कर्मचारी आणि अधिकारी काम करतात. नियोजनाअभावी तोट्यात सुरु असलेल्या या परिवहन उपक्रमाला महानगरपालिकेच्या अनुदानाचे टेकू लावून सुरू ठेवण्यात आले आहे. १८ ते २५ हजार महिना वेतनावर कंत्राटी वाहन चालक, वाहक तसेच अनेक कर्मचारी काम करत आहेत. एकीकडे कमी पगारात भागवावे लागत असताना आता पगार न मिळाल्याने घर चालवण्यासाठी उसनवारी करावी लागत आहे. त्यात विविध कर्जांचे हप्ते वेळेवर दिले नाही तर दंड आकारणी केली जाते. हा भुर्दंड काहीही कारण नसताना बसणार आहे, अशी समस्या अनेक कर्मचाऱ्यांनी मांडली.

मार्च महिन्यात पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षा संपल्या असून पुढील वर्गात प्रवेश घेताना त्याचे शुल्क एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भरावे लागते. मात्र पगार न मिळाल्याने अनेकांना शाळा प्रशासनाची मिन्नतवारी करावी लागत आहे. ज्यांना कमी पगार आहे अशा तृतीय व चतुर्थ श्रेणी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना तरी किमान वेळेवर पगार द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

परिवहन उपक्रमाने २०२५-२६ चा तब्बल ५३४ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यात वार्षिक २५० कोटींचे अनुदान नवी मुंबई महानगरपालिका दरवर्षी देते. एवढी उलाढाल असताना आर्थिक वर्षअखेरीचे कारण पुढे करून पगार रखडवले गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एनएमएमटीने फाइल वेळेवर महापालिकेला दिली मात्र त्यांनीच अनुदान देण्यास उशीर लावला असे कारण देत एनएमएमटी प्रशासन मोकळे झाले आहे. सध्या जी कमाई होते त्यातून निदान अत्यल्प वेतनावर काम करणारे कंत्राटी कर्मचारी व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाऊ शकत होते मात्र तशी मानसिकता नाही अशी खंत एका कर्मचाऱ्याने बोलून दाखवली. याबाबत परिवहन प्रशासनाला विचारणा केली असता मनपा कडून अनुदान प्राप्त झाले नाही. ते प्राप्त होताच वेतन तात्काळ केले जाईल असे सांगण्यात आले. तर या प्रकरणी मनपाच्या लेखा वित्त अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

एनएमएमटी कर्मचाऱ्यांना वेतन अद्याप मिळाले नाही. वास्तविक बस सेवा हि शहराची नाडी समजली जाते. तीच ज्यांच्या जीवावर सुरु आहे. अशांना वेळेवर वेतन केवळ लालफितीच्या दिरंगाईने मिळत नाही ही दुर्दैवी बाब आहे. डॉ. फईम शेख,अध्यक्ष, प्रवासी संघटना, एमएमआरडीए परिसर

राज्य परिवहन (एस टी महामंडळ)मध्ये वेतन नसल्याने जे ‘तू तू मी मी’ सुरू आहे तोच प्रकार नवी मुंबईतही एनएमएमटी परिवहनचा सुरू आहे. पालिकेने अनुदान दिले नसल्याचे कारण देण्यात आले आहे. एनएमएमटी प्रशासकीय कारभार ढिसाळ झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात आता वेतन वेळेवर नसल्याची भर पडली आहे. ज्यांच्या जीवावर एनएमएमटीचा गाडा ओढला जातो त्यांची चिंता नसल्याचे हे लक्षण आहे. – समीर बागवान, माजी परिवहन सदस्य

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmmt salary workers are worried as they have not received their march salary yet ssb