उरण : राज्याच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर होऊन नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. या संदर्भात केंद्रीय विमानन मंत्र्यांनी वारंवार नावाचा एकच प्रस्ताव असल्याचे जाहीर केले आहे. मात्र विमानतळ सुरू होण्याच्या तयारीत असतांनाही नावाची अधिसूचना का ? जाहीर केला जात नाही. याबद्दल आता शंका वाटू लागली असून येत्या पंधरा दिवसात नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाची अधिसूचना जाहीर न केल्यास पुन्हा एकदा संघर्ष आणि आरपारचा लढा सुरू केला जाईल अशी माहिती सर्व पक्षीय नवी मुंबई विमानतळ नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या वादाचे घोंगडे भिजत पडले आहे. पावसाळी अधिवेशनात लोकसभेतील शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनीच फक्त ‘दिबां’च्या नावासाठी आवाज उठविला आहे. त्यामुळे आता नामकरणाचा संघर्ष अधिक पेटण्याआधी लवकरच येत्या २१ ऑगस्ट ला सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली.

विमानतळ नामकरणाचा प्रस्ताव मागील दोन वर्षांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरी विना धूळखात पडून आहे. आता विविध राजकीय पक्षांचे नेते आजी माजी आमदार, खासदारांनी राग, रुसवे बाजूला ठेवून ‘दिबां’च्या नामकरणासाठी एकजूट होण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्यासाठी भेट घेऊन आग्रह करण्यात येणार आहे. विमानतळ नामकरण कृती समितीत सर्वच राजकीय तसेच सत्ताधारी, विरोधी पक्षांचे आमदार, खासदार, नेते, मंत्री, पुढाऱ्यांचाही समावेश आहे.

नामकरणात भिस्त ठाणे, पालघर लोकप्रतिनिधींवर

अनेक बैठकांना सत्ताधारी पक्षांचे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक गैरहजर राहतात. रायगडमधील लोकप्रतिनिधींना विमानतळ नामकरणासाठी होणाऱ्या बैठकीसाठी स्वारस्य नसल्याचे दिसून येत असल्याचा सुर आवळला जात आहे. त्यामुळे नामकरणासाठी सर्वात अधिक भिस्त ठाणे, पालघर जिल्ह्यातील आमदार, खासदारांवरच असल्याचे बोलले जात आहे.

बोर्डिंग पास, संरक्षण भिंत आणि मार्ग दर्शक फलकांवर ही नवी मुंबई विमानतळ उल्लेख : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यासाठीची तयारी सुरू आहे. यात विमानतळासाठी उभारण्यात आलेल्या संवक्षण भिंतीवर नवी मुंबई विमानतळ असे नमूद करण्यात आले आहे. तर बोर्डिंग पास वरही असाच उल्लेख असून पनवेल महानगरपालिकेने लावलेल्या दिशा दर्शक फलकावर ही अशाच प्रकाचा उल्लेख करण्यात आला आहे.

भूमिपुत्रांकडून संताप : सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या विमानतळाच्या विविध ठिकाणी नवी मुंबई विमानतळ असे उल्लेख असल्याने स्थानिक भूमिपुत्रांकडून असंतोष व्यक्त केला जात आहे.

२१ ऑगस्टच्या बैठकीसाठी सर्वांना निमंत्रण देण्यात येणार आहे. या बैठकीत नामकरणासाठी आरपारच्या लढाई आणि संघर्षाची दिशा ठरविण्यात येणार आहे. यावेळी रायगड,ठाणे व मुंबई या जिल्ह्यातील संपूर्ण परिसरात जनजागृती करण्यात येणार आहे. यात लाखो युवक सहभागी होणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.