पनवेल – खांदेश्वर येथे २७ जुलैला एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची ४७ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण ताजे असताना एका २१ वर्षीय तरुणाला पनवेल महापालिकेत लिपीक पदावर नोकरी लावतो असे खोटे आमिष दाखवून त्याच्याकडूनसुद्धा ३ लाख ७४ हजार रुपये उकळण्याचे दूसरे प्रकरण संशयीत आरोपी सचिन मोरे याच्याविरोधात पोलिसांनी मंगळवारी दाखल केले. मोरे याला मंगळवारी रात्री खांदेश्वर पोलीसांनी अटक केली आहे.

नवीन पनवेल येथील सेक्टर १५ ए येथील जय जयवंती सोसायटीत राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेने फसवणूक झाल्याबद्दल तक्रारी अर्ज पोलीसांकडे आल्यानंतर पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय वणे यांनी केलेल्या सखोल चौकशीमध्ये संशयित आरोपी सचिन मोरे त्याची मुलगी व वडिलांच्या बँक खात्यांवर विविध कारणांसाठी पीडित वृद्ध महिलेकडून रोख व त्यांच्या बँक खात्यावरून ४७ लाख ७९ हजार २८५ रुपये वळते झाल्याचे स्पष्ट झाले. पीडितेच्या पतीचे निधन झाले असून त्यांची मुलगी परदेशी राहत असल्याचे समजल्यावर मोरे याने पहिल्यांदी पीडितेचे घर भाड्याने घेऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पीडितेच्या संपत्तीची संपूर्ण माहिती मिळवल्यानंतर मोरे हा राहत असलेली सदनिका पीडित वृद्ध महिलेच्या मुलीच्या नावावर करण्याचे आश्वासन त्यांना दिले. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पीडितेचा बंगला ग्रामपंचायत रेर्कोडवरून नगरपालिकेच्या रेर्कोडवर आणून देतो असे आश्वासन दिले. तसेच पनवेलमधील एक दूकान अनधिकृत असून ते दूकान अधिकृत करून ते दूकान विक्री भाग पाडले. या दरम्यान वृद्ध महिलेकडून घेतलेली रक्कम परत न दिल्याने पीडितेने पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी अटकेची कारवाई सुरू असताना मुंबई येथील घाटकोपरमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने मोरे याने पनवेल महापालिकेत नोकरी लावतो, असे आश्वासन देऊन त्याच्याकडून पावणेचार लाख घेतले असून अडीच वर्षापासून तो नोकरीसुद्धा लावत नाही आणि घेतलेली रक्कम परत देत नसल्याने मोरे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा खांदेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवला. मोरे याने अजून अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.