शेकाप ४८, काँग्रेस १८, राष्ट्रवादी १२ जागांवर लढणार
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना शेकाप महाआघाडीच्या जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले आहे. शेतकरी कामगार पक्षाने ७८पैकी ४८ जागा स्वतसाठी ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसला १२ तर काँग्रेसला १८ जागा दिल्याची माहिती बुधवारी आमदार बाळाराम पाटील यांनी दिली. रिपब्लिकन सेनेला शेकापमधलाच वाटा मिळाला आहे. अजूनही सात जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित न झाल्यामुळे महाआघाडीने उमेदवारांची यादी जाहीर करणे बुधवारी सायंकाळपर्यंत टाळले.
शेकाप महाआघाडीमध्ये बिघाडी होत आहे का, याकडे भाजपच्या बडय़ा नेत्यांचे लक्ष लागले होते. काँग्रेसने सुरुवातीला ३० जागांची मागणी करत वाटपात खोडा घातला होता. मात्र चर्चेअंती बुधवारी महाआघाडीमधील १८ जागा काँग्रेसच्या वाटय़ाला आल्या, तर राष्ट्रवादीला १२ जागा मिळाल्या. मंगळवारी सायंकाळपर्यंत स्वबळाचा सूर काँग्रेसच्या गोटामध्ये आळवला जात होता. काँग्रेसची पनवेलमधील ताकद लक्षात घेता काँग्रेसचे रायगड तालुका अध्यक्ष नारायण ठाकूर यांनी नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले भीमसेन माळी यांना गप्प बसवले आणि महाआघाडीत राहण्याचा निर्धार सुनावला. राष्ट्रवादीने ताकद ओळखून कोणताही मोठा वाद निर्माण केला नाही.
७ जागांवरील उमेदवार अनिश्चित
तीनही राजकीय पक्षांचे उद्दिष्ट भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या गटाचा पराभव करणे हेच आहे. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत तीनही राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरू होती. प्रभाग क्रमांक २, ४, १०, ९, १७, २०, १५ यामधील काही जागांवरील उमेदवारांची नावे पक्की करण्यासाठी बैठक सुरू होती. काही ठिकाणी शेकापचे उमेदवार काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
१० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी २० दिवस आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना बुधवारअखेपर्यंत अवघ्या १० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल केले आहेत. हे अर्ज भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांनी दाखल केले आहेत. प्रभाग १३ मधून दिलीप भंडारे, १५ मधून सागर पगारे, पवन वाघमारे, ११ मधून शीतल कसबे, ५ मधून अविनाश निकम, ४ मधून वैशाली पंडित, ६ मधून बाबूराम गौव्हार, १२ मधून सुनील गोवारी, २० मधून भरत बहिरा, दिलीप परदेशी यांनी अर्ज केले आहेत.