पनवेल – पनवेलच्या प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) सिडको मंडळाकडून मिळालेली सूमारे पावणेतीन एकर जागेपैकी अडीच एकर जागा ही खड्यात असल्याने तेथे तळे साचले आहे. आरटीओ विभागाने ही जागा ताब्यात घेण्यापूर्वी सिडकोकडे समुद्रसपाटीपर्यंत तरी मातीचा भराव करून देण्यासाठी विनंती पत्र सिडकोला दिले. परंतू अडीच एकरचा हा खड्डा सिडकोने भरावा की आरटीओने या प्रशासकीय प्रपंचामध्ये पनवेलच्या आरटीओच्या मुख्यालय प्रशासन कार्यालय कोणत्या जागेवर उभे करावे असा पेच निर्माण झाला आहे. 

३ ऑक्टोबर २०१० रोजी पनवेल येथे स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) विभाग सुरू करण्यात आला. गेल्या १५ वर्षात सर्वाधिक महसूल मिळवून देणा-या विभागाला स्वताच्या मुख्यालयाची इमारत बांधता आली नाही. पनवेल आरटीओ विभागामध्ये गेल्या १५ वर्षीत हलक्या व जड,अवजड अशा साडेचार लाख वाहनांची नोंद करण्यात आली. यामधील तीन लाखांहून अधिक वाहने आजही रस्त्यावर धावत आहेत. परंतू गेल्या १५ वर्षात या वाहनांच्या तांत्रिक व महसूली कागदपत्रांवर लक्ष्य ठेवणारा आरटीओ विभागाला स्वताचे कार्यालय भाड्याच्या जागेत सुरू ठेवण्याची वेळ आली आहे.

सध्या खारघर येथील सिडको महागृहनिर्माणातील व्हैलिशिल्प या भव्य गृहसोसायटीमध्ये पनवेल आरटीओचे कार्यालय भाड्याने घेण्यात आले आहे. यासाठी सिडकोकडे वारंवार विनवण्या केल्यानंतर महिन्याला चार लाख रुपये देऊन व्हैलिशिल्प सोसायटीमधील काही गाळे भाड्याने घेऊन त्यामध्ये आरटीओचे कामकाज सुरू आहे. 

विशेष म्हणजे पनवेल आरटीओला २०१५ मध्ये सिडको मंडळाकडून करंजाडे येथे सहा एकर जागा देण्यात आली. या जागेसाठी ३ कोटी २२ लाख रुपये जमा केल्यावर या जागेपैकी मोठा भाग विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेत संपादित होत असल्याचे कळाल्यावर दूस-या जागेचा शोध सुरू झाला.

आरटीओचे तत्कालिन प्रादेशिक अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी तत्कालिन रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे वाहनांचे ब्रेक तपासणी ट्रकसाठी व इतर सुविधांसाठी तळोजा येथे १२ एकर जागा देण्यात आली. त्यापैकी पाच एकर जागेवर सध्या ब्रेक तपासणी ट्रक सुरू केले. मात्र इतर जागेचा मोठा भाग खड्यात गेल्याने त्यावर विकास कसा करावा असा प्रश्न आरटीओ विभागाच्या अधिका-यांना पडला आहे.

या दरम्यान आरटीओच्या अधिका-यांनी सिडको मंडळाकडे करंजाडे येथील जागेच्या बदल्यात इतरत्र जागा मिळावी यासाठी अनंत निवेदने दिले. तसेच सिडकोने नवीन भूखंड देताना करंजाडे येथील जागा सहा एकरच्या जागेच्या बदल्यात तळोजात भूखंडाचा दर जास्त असल्याने तफावतीची रक्कम सुद्धा  आरटीओला जानेवारी महिन्यात जमा करण्याच्या अटीवर तळोजा येथील सेक्टर ३० येथील ११,८९९.९७ चौरस मीटरचा (२.९४ एकर) भूखंड क्रमांक १ हा देण्याचा निर्णय घेतला. आरटीओने या भूखंडाची रक्कम सिडकोकडे जमा केली. मात्र संबंधित भूखंड हा तळोजा उपनगरापासून दूर असून या भूखंडपर्यंत वाहनांना येजासाठी रहदारीचा रुंद रस्ता नाही. तसेच औद्योगिक क्षेत्राला खेटून असलेल्या या भूखंडाची माती चोरीला गेल्यामुळे या भूखंडाला तलावाचे रूप आले आहे.

सिडको मंडळाकडून एकदा हा तलाव सदृष्य भूखंड आरटीओने ताब्यात घेतल्यावर सिडको मंडळाला बांधकामापूर्वी विकास शुल्क सुद्धा या भूखंडापोटी द्यावे लागणार असल्याने तलावसदृष्य भूखंड व्यवस्थित भराव करून देण्याची मागणी आरटीओच्या वरिष्ठ अधिका-यांनी सिडको मंडळाकडे केली. अद्याप यावर सिडकोने निर्णय न घेतल्याने पनवेल आरटीओच्या मुख्यालय बांधकामाविषयीची कार्यवाही ठप्प झाली.  

चौकटविशेष म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यावर पनवेल येथील राज्य परिवहन आगाराला भेट दिली. या भेटीमध्ये परिवहन मंत्र्यांनी आरटीओने खेचून आणलेली काही वाहने आगारामध्ये दिसल्याने लवकरात लवकर ही जागा मोकळी करण्याचा आदेश आरटीओला दिला. मात्र आरटीओच्या ताब्यात तलाव सदृष्य भूखंड असतील तर ही जप्त केलेली वाहने कुठे ठेवावी असा प्रश्न आरटीओ अधिका-यांसमोर उभा ठाकला आहे. आरटीओला सिडकोकडून मिळणारी जागा विकसित भूखंड असावा, या भूखंडावर मुख्यालयाच्या प्रशाकीय इमारतीमधून आरटीओचे कामकाज सुरू झाल्यावर सर्वसामान्यांना येजा करण्यासाठी तिथपर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे का याबाबत परिवहनमंत्र्यांनी सिडकोला विचारणा कऱण्याची गरज आहे. 

पनवेल आरटीओचे स्वताच्या जागेवर मुख्यालयाची प्रशासकीय इमारत असावी यासाठी सिडको मंडळाकडून मिळालेली जागेची मोजणी करण्यासंदर्भात आणि विकसित भूखंड मिळण्यासाठी आम्ही सिडकोकडे पाठपुरावा केला आहे. संबंधित जागेवर माती कमी असल्याने तेथे भराव करण्यासंदर्भात सिडको मंडळ सकारात्मक विचार करेल असे अपेक्षित आहे. जयंत पाटील, आरटीओ, पनवेल