पनवेल : कुंडेवहाळ गावातील ५५ वर्षीय संगिता नामदेव म्हात्रे यांचा गळा आवळून खून करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या महिला तपास पथकाने केवळ दोन दिवसांत अटक करून न्यायालयासमोर हजर केले. या तपासात महिला पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचा प्रेरणादायी संदेश मिळाल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी सांगितले.
दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सकाळी कुंडेवहाळ येथील घर क्रमांक ४७१ मध्ये संगिता म्हात्रे या महिलेचा गळा आवळून खून झाल्याची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासात महिलेचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यानुसार संगिता यांचा मुलगा सनी म्हात्रे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने या खूनाचा तपास आव्हानात्मक होता.
मात्र महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंढे, सारिका झांजुर्णे, पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे व पोलीस शिपाई विशाल दुधे यांच्या पथकाने परिसरातील ३० पेक्षा अधिक नागरिकांची चौकशी करून आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. तपासादरम्यान संगीता यांच्या घरापासून काही अंतरावर राहणा-या संशयीत आरोपी मोहम्मद समीर अल्लाउद्दीन अन्सारी (वय २३) याने मृत महिला संगिता यांना ४० हजार रुपये उसणे दिले होते.
वारंवार पैसे मागूनही ती रक्कम परत न दिल्याने संतापातून संगीता यांचा गळा त्याने आवळून खून केल्याचे उघड झाले.या गुन्ह्याचा उलगडा करताना महिला पोलिसांनी केलेल्या काटेकोर तपासामुळे आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया त्यांनी स्वबळावर पूर्ण केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह आयुक्त संजय ऐनपुरे आणि उपायुक्त प्रशांत मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. महिला पोलिसांच्या या प्रयत्नांमुळे पनवेल पोलिसांच्या कार्यक्षमतेचा आणि महिला सक्षमीकरणाचा उत्तम नमुना सादर झाला आहे.
