पनवेल – गणेशोत्सवात ४ सप्टेंबरच्या मध्यरात्री खुटारी गावातील नातेवाईकांच्या गटातटातील वादांमुळे रिव्हॉल्वरचा वापर करून झालेल्या भांडणामुळे तळोजात गॅंगवार झाल्याचे वृत्त पसरले होते, परंतू तळोजा पोलिसांनी एका कुटूंबातील चुलत नातेवाईकांच्या वादातून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणातील फरार संशय़ीत आरोपींना पकडण्यासाठी पोलीसांची तीन पथक स्थापन केली असून आतापर्यंत एकाही आरोपीला पोलीसांना अटक करण्यात यश आले नाही. अनेक गुन्हे दाखल असणा-या राजकुमार म्हात्रे या गुंडाला या प्रकरणात मारहाण झाल्यानंतर त्याने पहिली तक्रार ५ सप्टेंबरला तळोजा पोलिसांकडे नोंदवली. त्यानंतर १२ सप्टेंबरला या प्रकरणातील दूसरी तक्रार राजकुमारच्या विरोधात नोंदवण्यात आली आहे. राजकुमार याच्या भितीमुळे पोलिसांत आलो नसल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.
तळोजातील या भांडणांमध्ये दोन्ही प्रकरणातील तक्रारदारांनी रिव्हॉल्वरचा वापर केल्याचा उल्लेख केल्यामुळे या प्रकरणाला गॅंगवारचे स्वरूप आले. मात्र राजकुमार याच्यावर अनेक गुन्हे दाखल असले तरी राजकुमारला ५ सप्टेंबरला ज्याने मारहाण केली असा आरोप असणा-या अनिकेत म्हात्रे याच्यावर आतापर्यंत एकही गुन्हा नोंद नसल्याचे तळोजा पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अनिकेत व त्याचे साथीदार हे अद्याप पोलिसांना सापडले नाहीत. गेल्या तीन वर्षांत अनिकेत याने रेसॉर्ट व्यवसायात चांगले पाय रोवले आहेत. परंतू अनिकेत याला सुद्धा राजकुमार प्रमाणे सोन्याचे दागीने घालून आलिशान गाड्या घेऊन रिल बनविण्याचा छंद आहे. अनिकेतचे वडील एकनाथ म्हात्रे हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. तसेच राजकुमार म्हात्रे याचा भाऊ हा भाजपचा पदाधिकारी आहे.
गणेशोत्सवामध्ये ४ सप्टेंबरला रात्री १२ वाजता खुटारी गावामध्ये राजकुमार व अनिकेत पत्ते खेळण्यावरून खुटारी गावात वाद झाला. या वादावेळी राजकुमारने त्याच्या मित्राजवळून रिव्हॉल्ववर घेऊन अनिकेतवर ताणून ट्रीगर दाबला मात्र रिव्हॉल्ववरमधून गोळीबार झाला नाही. अखेर पत्ते खेळणा-या इतरांनी हस्तक्षेप केल्याने राजकुमार शिव्या देत तेथून निघून गेला. ही मूळ घटना असली तरी या घटनेबाबत अनिकेत व त्याच्या कोणत्याही साथीदाराने तळोजा पोलिसांना कळवले नव्हते. मात्र या घटनेचा राग मनात धरून अनिकेत व त्याच्या सात साथदारांनी दूस-या दिवशी म्हणजे ५ सप्टेंबरला राजकुमार व त्याच्या साथीदारांना गावात रात्री दोन वाजता गाठले आणि अनिकेतने त्याच्या जवळील रिव्हॉल्वरने हवेत दोनवेळेस गोळीबार केले आणि इतरांनी तलवार आणि इतर शस्त्रांने राजकुमारसह सूरज म्हात्रे याला बेदम मारहाण केली. राजकुमारला मारहाण केल्यावर त्याच्यावर पनवेल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. जखमी सूरज याने दिलेल्या तक्रारीवर या घटनेतील पहिला गुन्हा अनिकेत व इतर सात जणांविरोधात नोंदविण्यात आला.
राजकुमार हा गेली अनेक वर्षे सक्रिय नसला तरी त्याच्यावर यापूर्वी असलेल्या खूनाचा प्रयत्न, खंडणीसारख्या गुन्ह्यांमुळे त्याला मारहाण झाल्याच्या वृत्ताची प्रसारमाध्यमांवर बरीच चर्चा झाली. गुंड राजकुमारला गावातल्या म्हात्रे कुटूंबियांनीच मारला आणि राजकुमार याच्या कुटूंबातील मंडळी भाजपचे पदाधिकारी आणि अनिकेतचे वडील एकनाथ म्हात्रे हे शिवसेनेचे पदाधिकारी असल्याने भाजपच्या कार्यकर्त्याला कसा लोळवून मारला याची चर्चा तालुक्यात झाली. या घटनेनंतर तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांनी हा गॅंगवार नसून एका कुटूंबातील चुलत नातेवाईकांमध्ये परस्पर झालेल्या भांडणाचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच राजकुमार याला मारहाण करताना अनिकेत म्हात्रे याने रिव्हॉल्वरमधून दोनवेळा गोळीबार केल्याच्या आरोपामध्ये किती तथ्य आहे याचा शोध पोलीस घेत असल्याचे पोलीस अधिकारी भगत यांनी सांगीतले.
राजकुमार आणि अनिकेत या प्रकरणामुळे पुन्हा एकदा तळोजातील गुन्हेगारी डोके वर काढेल अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. विशेष म्हणजे या दोन्ही भांडणामध्ये रिव्हॉल्वरचा वापर केल्याने सोने गळ्यात घालून आलिशान गाड्यांमध्ये फीरताना रिल बनून ‘रिलभाई’ बनण्याचे स्वप्न पनवेलच्या अनेक तरूणांमध्ये आजही कायम असल्याचे दिसते. या संपुर्ण घटनेत अनिकेत म्हात्रे याने गेल्या तीन वर्षात रिसॉर्ट व्यवसायात स्वताची ओळख निर्माण करून चांगले नाव कमावले होते. मात्र त्याच्या एका चुकीमुळे त्याला भाईंच्या रांगेत उभे करण्यात आले. आलिशान गाड्या आणि सोनसाखळीच्या चढाओढीच्या रिलभाईमुळे अनिकेतचेही नाव पोलिसांच्या दफ्तरी नोंदवले गेले.