नवी मुंबई : महावितरणचे वाशी येथील वीज भरणा केंद्र आणि तक्रार निवारण विभाग अचानक कोपरखैरणे येथे हलविण्याचा निर्णय झाल्याने यासंबंधी वाशीकर रहिवाशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वीज देयके, इतर समस्यांसाठी वाशीतील नागरिकांनी कोपरखैरणेपर्यंत प्रवास का करायचा आणि हे केंद्र हलविण्यामागे नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित होत आहे. वाशीतील ज्येष्ठ नागरिकांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

वाशी उपनगरात अनेक महत्त्वाची महाविद्यालये, खासगी आणि शासकीय रुग्णालये, पोलीस स्थानके, बँक कार्यालये, सिडको कार्यालये तसेच अनेक मोठी कार्यालये तसेच सांस्कृतिक ठिकाणे आहेत. महावितरणचे वीज भरणा केंद्र आणि तक्रार निवारण विभाग हे या शहरात आहे. हे केंद्र येथील नागरिकांना वीज भरणा करण्यासाठी तसेच इतर तक्रारींसाठी सोयीचे पडते. वाशी आणि इतर परिसरातील रहिवाशांना कोणत्याही प्रश्नासाठी ‘महावितरण’च्या वाशी कार्यालयात तात्काळ पोहोचणे देखील शक्य होते. मात्र, महावितरणच्यावतीने हे केंद्र वाशी येथून कौपरखैरणे येथे स्थलांतरित केले जात आहे. या स्थलांतरामुळे वाशीतील नागरिकांची गैरसोय होणार असल्याचे चित्र आहे. तसेच कोपरखैरणे येथे जाण्यासाठी नागरिकांना अधिक वेळ आणि पैसा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांकडून भरणा केंद्राच्या आणि तक्रार विभागाच्या स्थलांतरास विरोध होत आहे.

लोकप्रतिनिधी आक्रमक

हे सुविधा आणि वीज भरणा केंद्र स्थलांतरित केले जाऊ नये यासाठी वाशीतील माजी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी शुक्रवारी ज्येष्ठ रहिवाशांच्या एका शिष्टमंडळासह वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. हे स्थलांतर तातडीने थांबवावे या संदर्भात वाशी महावितरणाच्या अधीक्षक अभियंता यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली. दरम्यान, यासंबंधी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता रामलिंग बेले यांची भेट घेऊन रहिवाशांनी आपली भूमिका मांडली. दरम्यान वीज वितरण कंपनीने अद्याप याविषयी आपली भूमीका स्पष्ट केलेली नाही.