पनवेल – पनवेल महापालिका क्षेत्रातील धानसर गावामधील एका रेसॉर्ट चालकाने केलेल्या अश्लिल प्रकारामुळे त्याला पोलीसांनी अटक केली आहे. रिसॉर्टमध्ये विरंगुळ्यासाठी आलेल्या महिलांच्या ध्वनिचित्रफीत बनविण्यासाठी या रिसॉर्टचालकाने छुपा कॅमेरा स्वच्छतागृहात लावला होता. याबाबत संबंधित कुटुंबातील एका मुलाला संशय आल्याने हे प्रकरण उघडकीस आले.
तळोजा पोलीस ठाण्यात याबाबत ३५ वर्षीय रिसॉर्ट चालक मनोज चौधरी याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खारघर येथील रांजनपाडा गावात मनोज राहत होता. पनवेल महापालिका क्षेत्रातील धानसर गावामध्ये हे रिसॉर्ट असून गेल्या काही महिन्यांपासून एकरकमी अनामत रक्कम घेऊन रिसॉर्टमालकाने हे रिसॉर्ट चालविण्याची जबाबदारी मनोज याच्यावर सोपवली होती.
मुंब्रा येथील एक कुटुंब शनिवारी (ता.२५) निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी या रिसॉर्टमध्ये आले होते. रिसॉर्टमध्ये प्रवेश केल्यावर दुपारच्या वेळेस संबंधित कुटुंबातील महिला सदस्यांनी स्वच्छतागृहाचा वापर केला. तसेच मध्य रात्रीच्या वेळेस सुद्धा स्वच्छतागृहाचा वापर केला. मात्र रविवारी सकाळी याच कुटुंबातील एका मुलाला स्वच्छता गृहातील विजेच्या बल्बमधील होल्डर विषयी संशय आल्यावर त्याने संबंधित होल्डरची तपासणी केल्यावर छुपा कॅमेरा त्या होल्डरमध्ये असल्याचे समोर आली.
यानंतर संबंधित कुटुंबियांनी या होल्डरमध्ये झालेल्या रेकॉर्डिंगची माहिती घेतल्यावर त्यामध्ये महिला आंघोळ करतानाचे चित्रिकरण कैद झाल्याचे समोर आले. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात संबंधित कुटूंबियांनी धाव घेतल्यावर रविवारी रिसॉर्टचालक मनोज चौधरी याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांनी दिली.
तसेच या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सागर निकम हे करत आहे. तळोजा पोलीस ठाण्यात मनोज चौधरी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७७ सह, माहिती व तंत्रज्ञान कायदा ६६ (ई) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
