२०२० मध्ये १७५ अपघातांत १७८ जणांचा मृत्यू

नवी मुंबई : २०२० वर्षांत नवी मुंबईत रस्ते अपघातांत घट झाल्याचे पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. एकूण १७५ अति गंभीरअपघातांत १७८ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ च्या तुलनेत १३१ अपघात कमी झाले असून मृतांची संख्या ६१ ने कमी झाली आहे. टाळेबंदी काळात वाहतुकीवर आलेल्या र्निबधामुळे ही घट दिसत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

२०१४ ते २०१८ या पाच वर्षांत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तब्बल १ हजार ६५६ अति गंभीर अपघातांत नागरिकांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते. या पाच वर्षांची सरासरी काढली तर नवी मुंबईत दरवर्षी ३३१ लोक अपघातात मृत्युमुखी पडत होते. यात सर्वाधिक मृत्यू हे वेळेवर उपचार न मिळाल्याने होत होते.

२०१९ मध्ये २३१ अति गंभीर अपघात झाले असून यात २३९ जणांचा मृत्यू झाला होता तर २०२० मध्ये १७५ अति गंभीर अपघातात १७८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात दुचाकी अपघातांची संख्या मोठी आहे. २०१९ मध्ये दुचाकींचे १८५ अतिगंभीर अपघात झाले असून त्यात ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०२० वर्षांत ९९अपघात  झाले असून त्यात ९२ जणांचा मृत्यू झाला आहे.

३२६ जण जखमी

गंभीर अपघातांची संख्याही २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये कमीच आहे. २०१९ मध्ये जानेवारी ते डिसेंबर दरम्यान ४११ गंभीर अपघात झाले असून यात ५८९ जण जखमी झालेले आहेत. तर २०२० मध्ये २७७ गंभीर अपघात झाले असून यात ३२६ जण जखमी झाले आहेत.

कोरोना टाळेबंदीमुळे अपघात आणि अपघाती मृत्यूंत घट झाली आहे. त्याचप्रमाणे वाहतूक विभाग दरवर्षी मोठय़ा प्रमाणात विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवतात. यात महाविद्यालय, मोठय़ा कंपन्या, सोसायटय़ा आदी ठिकाणी जनजागृती केली जात आहे. त्यामुळे अपघात कमी होत आहेत. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळले तर निश्चित अपघातात कमालीची घट दिसून येईल.

-पुरुषोत्तम कराड, उपायुक्त, वाहतूक पोलीस विभाग