Shivaji Chowk in Nerul statue of Chatrpati shivrai throne navi Mumbai news ysh 95 | Loksatta

नेरुळमध्ये शिवाजी चौकाचा कायापालट; सिंहासनारुढ शिवरायांच्या पुतळ्याचे आकर्षण…

नवी मुंबई महापालिकेच्यावतीने नेरुळ सेक्टर १ येथील छत्रपती शिवजी महाराज चौकाचा कायापालट होणार असून आकर्षक मेघडंबरीमध्ये शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा साकारण्यात येणार आहे.

नेरुळमध्ये शिवाजी चौकाचा कायापालट; सिंहासनारुढ शिवरायांच्या पुतळ्याचे आकर्षण…
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

नवी मुंबई: संपूर्ण राज्यभरात छत्रपती शिवरायांच्याबाबतच्या विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडून शिवरायांबाबत विविध वक्तव्यामुळे आरोपांची राळ उडत असताना दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेच्यावतीने नेरुळ सेक्टर १ येथील छत्रपती शिवजी महाराज चौकाचा कायापालट होणार आहे. आकर्षक मेघडंबरीमध्ये शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा साकारण्यात येणार असून या चौकात आकर्षक असा मावळ्यांचा देखावाही साकारण्यात येणार आहे. त्यामुळे नेरुळ सेक्टर १ येथील शिवाजी चौकाचे रुपडे पालटणार असून या कामाला वेगाने सुरवात झाली आहे. मावळ्यांच्या देखाव्याचे तसेच इतर कामे महिनाभरात करण्यात येणार असून शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळ्याचे काम वेगाने होत आहे. येथील सर्व कामांसाठी जवळजवळ १ कोटीपेक्षा अधिकचा खर्च होणार आहे. त्यामुळे या चौकाचे रुपडे अधिक आकर्षक होणार आहे.

नवी मुंबई शहरात वाशी येथील शिवाजी चौकात या परिसरात आकर्षक असे रुप देण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती असलेल्या शिवाजी चौकाची आगळी ओळख निर्माण झालेली असताना दुसरीकडे नेरुळ सेक्टर १ येथील शिवाजी चौकातही मेघडंबरीमध्ये शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा साकारला जाणार आहे. तसेच या गोलाकार चौकाची सर्वबाजुंनी रुंदी कमी केली जाणार आहे. त्यामुळे सुरळीतपणे वाहतूक होण्यासही मदत होईल. तसेच याच परिसरात विविध शैक्षणिक संस्था तसेच डॉ. डी वाय पाटील स्टेडियम असल्याने या परिसराला अधिकच आकर्षक रुप येणार आहे. या चौकाला शिवाजी चौक व या चौकात असलेल्या देखण्या मेघडंबरीत सिंहासनारुढ पुतळा साकारण्याची मागणी माजी महापौर जयवंत सुतार  तसेच कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे देवनाथ म्हात्रे यांनी केली होती. नवी मुंबई नियोजित शहर असून या शहराला आकर्षक व देखणे रुप देण्याचे काम महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. नेरुळ परिसरात असलेल्या डी वाय पाटील या स्टेडियममुळे व त्या ठिकाणी होणाऱ्या क्रिकेट फुटबॉल स्पर्धांमुळे या विभागाला शोभा असून शिवरायांच्या पुतळ्यामुळे या विभागाला व चौकाला अधिक देखणे व आकर्षक रुप मिळणार आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबईत शहर रंगरंगोटीसाठी करोडोंचा खर्च; पण महापौर बंगल्यासमोरील उद्यान नामफलक बघतोय रंगरंगोटीची वाट

नेरुळ येथील मेघडंबरी असताना सातत्याने त्याठिकाणी तमाम महाराष्ट्राचे व देशाचे श्रध्दास्थान असलेल्या शिवरायांचा आकर्षक व देखणा सिंहासनारुढ पुतळा उभारण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती. माजी महापौर जयवंत सुतार यांनीही यासाठी प्रयत्न केले आहेत.

-देवनाथ म्हात्रे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट

नेरुळ येथील शिवाजी चौकात पालिकेच्यावतीने काम सुरु असून मेघडंबरीत शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा बसवण्यात येणार आहे. एकंदरीतच येथील सर्व कामासाठी जवळजवळ १ कोटीचा खर्च येणार आहे. पुढील काही कालावधीत येथील काम पूर्ण करण्यात येईल.

-पंढरीनाथ चौडे, अभियंता, नवी मुंबई महापालिका

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 18:09 IST
Next Story
नवी मुंबई शहरात अद्याप निम्याहून अधिक रिक्षांचे कॅलीब्रेशन नाहीच; परिवहन कार्यालयाकडून १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ