मालमत्ता कर थकवणाऱ्या २१ जणांच्या मालमत्ता जप्त; एकूण २२ कोटींची थकबाकी

मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या २१ जणांच्या मालमत्ता महापालिकेने गुरुवारी जप्त केल्या.  त्यांची एकूण थकीत रक्कम २२ कोटी १६ लक्ष ५३ हजार ७४६ रुपये आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महसूलवृद्धीसाठी ही कायदेशीर कारवाई केली. मालमत्ता कर हा पालिकेचा महत्त्वाचा उत्पन्नस्रोत आहे.

मालमत्ता कर विभागाचे उपआयुक्त उमेश वाघ यांच्यामार्फत मालमत्ता कर देयके सर्वाना देण्यात आली आहेत. १ लाखापेक्षा अधिक मालमत्ता कराची थकबाकी असणाऱ्या १ लाख ६  थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यापैकी १७७१ मोठय़ा थकबाकीदारांना थकबाकीसह मालमत्ता कर भरण्यासाठी ४८ तासांची नोटीस बजाविण्यात आली असून त्यापैकी मोठय़ा प्रमाणात मालमत्ता कर थकविणाऱ्या २१ थकबाकीदारांच्या मालमत्ता गुरुवारी जप्त करण्यात आल्या.

या थकबाकीदारांना आपली रक्कम भरण्यासाठी ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अशाचप्रकारे सर्वच थकबाकीदारांवर टप्प्या-टप्प्याने जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडील कराची थकबाकी तत्परतेने भरावी व कारवाई टाळावी, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

जप्ती आलेले थकबाकीदार

सेक्टर ११ बेलापूर येथील रामा पेट्रोकेमिकल्स, एस.के.व्ही. इंडस्ट्रियल प्लांट अँड वेस्ट ट्रिटमेंट प्रा.लि., से. ४४ ए नेरुळ येथील महात्मा फुले ट्रस्ट, से. ५० नेरुळ येथील मुकेश रखानी, से.१६ ए, नेरुळ येथील मे. सिटी बिल्डर्स, १८ डॅपोडिल्स, १४ वाशी, से. ४२, नेरुळ येथील मे. नीलगगन को-ऑप. हौ. सोसायटी, से.२९ वाशी येथील सुनेहरी यादे कल्चर फाऊंडेशन, से. १७ वाशी येथील मे. मिठा इस्टेट, कोपरी गावियो वाशी येथील संगीता चंद्रकांत पाटील व इतर, से. १९ सी तुर्भे येथील वेलजी शिवाजी आणि कं., सेक्टर ११ सानपाडा येथील भूमी कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट, से. १९ ए तुर्भे येथील मे. आर. शांतीलाल अँड कं., वाशी स्थानक – फिचनर कन्सल्टिंग इंजिनीअर्स लि., से. २ ए कोपरखैरणे येथील द ड्रेस को-ऑप. हौ. सोसायटी लि., से. १४ कोपरखैरणे – सेक्रेटरी हिंदू विद्याभवन, से.२ ए कोपरखैरणे येथील बालाजी डेव्हलपर्स, घणसोलीतील शिवनाथ म्हात्रे, से. ४ घणसोली येथील जनाधार शिक्षण प्रसारक, से. ३ घणसोली येथील बँक ऑफ इंडिया, से. २० ऐरोली येथील महादू काना ठाकूर, से. १९ ऐरोलीतील कांतीलाल बी झवेरी.