लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पनवेल : नवी मुंबईतून एकाच दिवशी आठ मुले-मुली बेपत्ता झाल्याच्या चार दिवसांपूर्वीच्या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पोलीसही चक्रावून गेले होते. मात्र यापैकी पाच मुले त्याच दिवशी घरी परतली. तर अन्य दोघांना पोलिसांनी ठाणे, पालघर जिल्ह्यांतून शोधून काढले. तर घर सोडून गेलेला एक मुलगा शुक्रवारी सापडला आहे. त्यामुळे पालकांनी न घाबरण्याचे आवाहन नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले आहे. दरम्यान, गेल्या अकरा महिन्यांत बेपत्ता झालेल्या अनेक मुला-मुलींपैकी बऱ्याच जणांचा शोध लागला आहे. असे असले तरी अद्याप ४५ जणांचा शोध घेतला जात असून त्यासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत.

नवी मुंबईतून मागील अकरा महिन्यांत ३७१ बालके घर सोडून गेली. याबाबत नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी ३२६ मुलांचा शोध नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने लावला. अद्याप न सापडलेल्या मुलामुलींची संख्या ४५ असून त्यात ३७ मुली तर ८ मुले आहेत. या मुला-मुलींच्या शोध मोहिमेसाठी नवी मुंबई पोलिसांची दोन स्वतंत्र पथके काम करीत आहेत.

आणखी वाचा-दुचाकी चोरी करण्याची अफलातून कल्पना, मात्र परिमाण एकच…’पोलीस कोठडी’, वाचा नेमकं काय प्रकार आहे… 

३७१ बालकांमध्ये मुलींची संख्या २७२ तर मुलांची संख्या ९९ एवढी आहे. पोलिसांना सापडलेल्या बालकांमध्ये २३५ मुली सापडल्या, तर मुले ९१ मुले सापडली. मागील ११ महिन्यांत विविध कारणांमुळे या बालकांनी घरे सोडली. बालक पळवून नेण्याचे प्रमाण कमी असले तरी १६ वयोगटावरील मुलींची पळून जाण्याचे आणि त्यानंतर घरी येण्याचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

जानेवारी ते नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत नवी मुंबई पोलीस दलाच्या मानवी तस्करी विरोधी कक्षाने अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रकरणात यशस्वी शोध मोहीम केली. मात्र अजूनही ४५ मुलामुलींचा शोध लागलेला नाही. नवी मुंबई पोलीस दलाचे साहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी दिलेल्या माहितीवरून मागील काही दिवसांत मुलांचा शोध लावूनही समाजमाध्यमांवर गैरसमज पसरविणाऱ्या लघुसंदेशामुळे अहोरात्र तपास करणाऱ्या पोलिसांच्या पथकाचे मनोबल खच्चीकरण होण्याची शक्यता आहे.

मानवी तस्करी विरोधी कक्षाची दोन पथके आणि संबंधित पोलीस ठाण्याचे स्वतंत्र एक पथक मुलामुलींच्या शोध मोहिमेत गुंतली आहेत. १६ वर्षे वयाच्या मुलींचे घर सोडून जाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त राठोड यांनी सांगितले. पोलीस अधिकारी राठोड यांनी मुलांना स्वगृही परत आणण्यासाठी पोलिसांच्या धडपडीबद्दल सांगितले.

आणखी वाचा-वय वर्ष केवळ १९ आणि ९ गुन्हे! आरोपी जेरबंद, पैशांचे आमिष दाखवून करत होता फसवणूक

सावत्र आईमुळे घर सोडले

काही दिवसांपूर्वी हरविलेल्या एका बालकाचा शोध याच पोलीस पथकाने लावण्यासाठी अकोला गाठले. तेथे पथकाला मुलगा सापडला. मुलाला पोलिसांनी समुपदेशन केल्यानंतर त्या बालकाने दिलेल्या जबाबाप्रमाणे सावत्र आईमुळे त्याने घर सोडल्याचे सांगितले. त्या मुलाची स्वगृही परतण्याची इच्छा नव्हती. मात्र पोलिसांनी त्याचे योग्य समुपदेशन केल्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त राठोड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

३७१- अकरा महिन्यांत हरवलेली मुले-मुली

३२६- सापडलेली मुले-मुली

४५- अद्याप न सापडलेली मुले-मुली

मुले आणि पालक यांमधील नाते व संवादसेतू तुटत चालला आहे का? घरातील पर्यावरण अविश्वसनीय झाले आहे का? विवेकी विचारांचे संस्कार कमी पडतात का? यावर चिंतन व्हायला हवे. सदोष,समाजघातक, व्यक्तिमत्त्वांचा या मुलांशी संपर्क होत आहे का? मुलांना कुठल्या गोष्टींची भुरळ पडली आहे? अशा अनेक प्रश्नांचा विचार करावा लागेल. -डॉ. प्रदीप पाटकर, मनोविकारतज्ज्ञ, ज्येष्ठ समुपदेशक

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teams to search for missing children more girls among the missing mrj