महिलांसाठीच्या दहा बस एनएमएमटीकडे दाखल; प्रादेशिक परिवहनकडून बस गाडय़ांची तपासणी

खास महिलांसाठी चालवण्यात येणाऱ्या दहा तेजस्विनी बस एनएमएमटीकडे दाखल झाल्या असून पुढील आठवडय़ात त्या नवी मुंबईतील रस्त्यांवर धावणार आहेत. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या बस घेण्यात आल्या असून त्याचे चालक व वाहकही महिलाच असणार आहेत.

शहरातील गर्दीचे मार्ग असलेल्या व महिलांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या नियमित मार्गावर या महिला विशेष बस चालवण्यात येणार आहेत. दहाही बस पूर्णत: स्वयंचलित प्रकारातील असल्याने या बसच्या चालक-वाहक महिलाच असणार आहेत, विशेष सुरक्षारक्षकदेखील देण्याचा परिवहनचा प्रयत्न राहणार आहे.

या बस घेण्यासाठी राज्य शासनाकडून प्रतिबस २५ लाख याप्रमाणे २.५ कोटी, तर परिवहन उपक्रमाकडून ५ लाख प्रमाणे ५० लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. प्रत्येक बसमध्ये ३२ सीट आहेत.

पहिल्या टप्प्यात पाच व आता पाच आशा दहाही बस प्राप्त झाल्या असून प्रादेशिक परिवहनकडून या बस गाडय़ांची तपासणी (पासिंग) केली जात आहे. त्यांच्या रंगसंगती व डिझाइनमुळे काहीसा उशीर झाल्याचे बोलले जात आहे.  आता त्या दहाही बस एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून पुढील आठवडयापासून नवी मुंबईतील रस्त्यांवर धावणार आहेत.

तोटय़ातील परिवहनला तेजस्विनी आधार देणार का?

एनएमएमटी सध्या आर्थिक संकटात आहे. त्यांच्याकडे ४८२ बसगाडय़ा असून त्यातील सरासरी ४५० बस मुंबई, कल्याण, डोंबिवली, उरण, पनवेल, भिवंडी, बदलापूर अशा पालिकाक्षेत्राबाहेरील भागात धावत आहेत. यातून परिवहनला १० कोटींचे उत्पन्न मिळत आहे, मात्र खर्च १४  कोटींपर्यंत होत आहे. हा तोटा सहन करीत असतानाच आता या महिला विशेष बस सुरू करण्यात येणार आहे. त्यांना महिला प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे प्रशासनाचे लक्ष लागून आहे.

दहाही तेजस्विनी बस एनएमएमटी उपक्रमाकडे मिळाल्या आहेत. पुढील तीन-चार दिवसांत त्यांचा शुभारंभ करण्यात येईल. गर्दीच्या वेळी महिलांसाठी तर इतर वेळी सर्वासाठी या बस धावतील. महिलांसाठीचे उपयुक्त ठरतील असे मार्ग निवडण्यात येतील.

-शिरीष आदरवाड, व्यवस्थापक, एनएमएमटी