नवी मुंबई : मागील अनेक दिवसापासून उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट, कॉंग्रेस पक्षातील अनेक दिग्गज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा नवी मुंबईत सुरु होती. त्यावर शिक्कामोर्तब झाले असून मंगळवारी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जवळजवळ १३ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काही पदाधिकारी यांनी आपल्या सोयीचे राजकारण साधत विविध पक्षात प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले. नवी मुंबईत शिवसेना उबाठा गटाचे शहर संघटक सोमनाथ वास्कर व माजी नगरसेविका पत्नी कोमल वास्कर ,महानगरप्रमुख रतन मांडवे व माजी नगरसेविका पत्नी सुनिता मांडवे, शहरप्रमुख काशिनाथ पवार , उबाठा गटाचे माजी नगरसेवक रंगनाथ औटी, भारती कोळी तसेच तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक वैभव गायकवाड ,दिव्या गायकवाड तसेच कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाथ लाड, माजी नगरसेवक अंकुश सोनावणे माजी नगरसेविका हेमांगी सोनावणे या सर्वांना मंगळवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार आहे. शहरभर याबाबतचे फलक झळकत असून या पक्षप्रवेशामुळे नवी मुंबईत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

आमचा पक्षवाढीसाठी आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने पक्षवाढीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून मंगळवारी शहरातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असून आगामी काळात आणखी प्रवेश होणार आहेत.आमची ताकद वाढवण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे. किशोर पाटकर ,जिल्हाध्यक्ष, शिवसेना शिंदे गट

आमच्या प्रभागातील नागरीकांशी चर्चा करुन नागरीकांच्या समस्या साेडवण्यासाठी तसेच प्रभागाच्या विकासासाठी शिवसेना शिंदे गटात सपत्नीक प्रवेश करणार आहे. वैभव गायकवाड, माजी नगरसेवक राष्ट्रवादी शरद पवार गट

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thirteen ex corporators to join shiv sena shinde party on tuesday at vashi in presence of eknath shinde sud 02