पनवेल : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या नागरिकांनी शनिवारी सकाळपासून मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी वर्दळ केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुनी तहसिल कचेरी परिसर, रेल्वे स्थानकाकडून पनवेल शहरात येणारा मार्ग तसेच मुख्य मार्गांवर तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. विशेष म्हणजे या कोंडीचा त्रास रुग्णवाहिकांना सुद्धा सहन करावा लागला.
चारचाकी मोटारी घेऊन आलेल्या नागरिकांची संख्या वाढल्याने शहरातील वाहनतळ पूर्ण भरले असून, पार्किंगसाठी जागा मिळेनाशी झाली आहे. परिणामी चालकांनी गाड्या उपलब्ध जागेत उभ्या केल्याने रस्त्याची क्षमता कमी झाली आहे. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील पोलीस चौकी परिसरातच काही वाहनचालक आपली वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीचा वेग पूर्णपणे खंडित होत आहे.
रस्त्याच्या कडेला दिवाळीच्या पणत्या, फटाके, रांगोळी साहित्य विकणाऱ्या फेरीवाल्यांनी पादचारी मार्ग व रस्त्याचा काही भाग व्यापला आहे. त्यामुळे तीन आसनी रिक्षा आणि दुचाकीस्वारांना मार्ग काढणे कठीण बनले आहे. काही ठिकाणी केवळ एक-दोन पोलीस कर्मचारी तैनात असल्याने वाहतूक नियंत्रणात अडचणी येत आहेत.
पनवेल महानगरपालिकेकडून वाहतूक नियंत्रणासाठी वॉर्डन नेमण्यात आले असले तरी परिस्थितीत काहीही सुधारणा झालेली नाही, अशी नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच पादचारी मार्गांवर चहाचे ठेले आणि सायकल दुरुस्ती दुकाने असल्याने अतिक्रमणविरोधी पथकाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
दिवाळीपूर्वी वाढलेल्या या गोंधळामुळे पनवेलकरांच्या संयमाची कसोटी लागली आहे. याबाबत पनवेल शहर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी संबंधित ठिकाणी तातडीने कर्मचारी पाठवून वाहतूक सुरळीत करतो असे सांगितले.