नवी मुंबई : आज सकाळी ठाणे बेलापूर मार्गावर घणसोली उड्डाणपुलाच्या सुरवातीलाच ट्रकचा अपघात झाला. त्यात ट्रक वरील कंटेनर खाली पडल्याने उड्डाणपूल आणि त्या खालील मार्ग दोन्ही बंद पडल्याने काही वेळातच अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. वाहनाच्या रांगा ऐरोली पर्यंत गेल्या होत्या. सकाळी ९ पर्यंत एका बाजूने वाहतूक सुरु करण्यात यश आले आहे.

आज सकाळी सातच्या सुमारास ठाणे बेलापूर मार्गावर घणसोली स्टेशन उड्डाण पुलावरून खाली उतरताच दुभाजकावर एक ट्रक चढला. हा ट्रक जेएनपीटी कडून ठाणे बेलापूर मार्गाचा वापर करीत ठाण्याच्या दिशेने जात होता. अपघात एवढा जबर झाला कि ट्रक वरील कंटेनर मागील दोन चाकांच्या सहित खाली रस्त्यावर पडले. त्यामुळे प्रथम दर्शनी दोन ट्रक एकमेकांच्या समोर आदळून अपघात झाल्याचे दिसून येत होते.

या अपघातात ट्रकचा कंटेनर बेलापूरच्या मार्गिकेवर पडल्याने बेलापूर कडे जाणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक तुकाराम पवळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत हलक्या वाहनांना मार्ग करून दिला. तसेच वाहतूक नियंत्रण करण्यास बंदोबस्त तैनात करण्यात आला.

दरम्यान हायड्रा क्रेन मागवून कंटेनर वाहतुकी पुरता बाजूला करण्यात आला असून ९ नंतर एक मार्गिकेची वाहतूक सुरु करण्यात आली.सकाळची वेळ असल्याने जड अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने काही वेळात ऐरोली पर्यंत वाहतूक खोळंबली होती. त्यात मुलुंडच्या दिशेने येणारी जड अवजड वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र तात्काळ वाहतूक पूर्ण थांबवून वाहतूक पोलिसांनी अपघात ग्रस्त गाडी बाजूला घेत एक बाजूने वाहतूक सुरु केल्याने आता वाहतूक हलती झाली आहे. त्यामुळे हळू हळू वाहतूक सुरु झाली. लवकरच अपघात ग्रस्त गाडी पूर्णपणे बाजूला करीत वाहतूक सुरळीत होईल अशी माहिती वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुकाराम पवळे यांनी दिली.

ठाणे बेलापूर मार्गावर उड्डाणपुलाच्या सुरवातीला आणि शेवटी उड्डाणपूल सुरु होत आहे वा संपत आहे अशा सूचना लावण्यात आलेल्या नाहीत तसेच अन्य कुठलेली रेडियम अथवा वाहन चालकांच्या लक्षात येईल असे चिन्ह लावण्यात आलेली नाही. त्यामुळे असे अपघात नित्याचेच झालेले आहेत. दोनच दिवसापूर्वी घणसोली रबाळे उड्डाणपुलावर असाच कंटेनरचा अपघात होऊन वाहतूक कोंडी झाली होती.