उरण : आदिशक्ती, मातृशक्ती म्हणून शारदोनवरात्रौसव सुरू असून उरणमधील गावदेवींचा जागर सुरू आहे. यात प्रामुख्याने जसखारची रत्नेश्वरी,करंजाची द्रोणागिरी,डोंगरीची अंबादेवी,नवीन शेवा येथील शांतेश्वरी,जासई येथील जोगेश्वरी, पिरवाडी आणि मोरा येथील एकविरा आणि गावोगावी,घरोघरी घटस्थापना करून हा जागर केला जात आहे.

उरण शहराच्या मोरा गावालगतच्या डोंगरातील कातळात एकविरा देवीचे पुरातन मंदिर आहे. तर, मोरा येथील देवीच्या मंदिराला पौराणिक असा इतिहास असल्याचे सांगण्यात येते. तर, नवरात्रीच्या निमित्ताने उरण तालुक्यातील शेकडो भाविक हे मोरा येथील एकविरा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी आवर्जून येत असल्यचे सांगितले आहे.

एका आख्यायिकेनुसार महाभारताच्या काळात देवी मोरा येथील डोंगरामतील कातळात इथे आल्याची आख्यायिका असून त्यानंतर ही देवी कार्ला येथील एकविरा येथे स्थापित झाल्याचे सांगण्यात येते. यामध्ये, डोंगराच्या वरच्या भागात असलेल्या कातळावर देवीच्या पायाचे ठसे उमटलेले असून याठिकाणी जाण्यासाठी मंदिराच्या डाव्या बाजूने चालत जावे लागत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, देवी परत जाताना तिचे पाय उमटले असल्याची आख्यायिका आहे.

त्याचबरोबर, देवीच्या या मंदिराच्या डोंगराच्या वरच्या भागातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाहाचे पाणी हे खाली ‘हौदा’त जमा होत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यातील पाणी हे वर्षभर पुरत असल्याचे सांगण्यात आले आहे.

तर, चैत्र महिन्यात असलेल्या देवीच्या यात्रेच्या दिवशी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येतो. चिरनेर येथील साडेतीन शक्तीपिठाचा देखावा ठरणार आकर्षण। नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्याने उरण तालुक्यातील गावोगावी आदिशक्तीच्या ‘देवी’चा जागराने दुंदुमणार होणार आहे. त्यातच, चिरनेर येथे साकारण्यात येणार साडेतीन शक्तीपीठाचा देखावा हा आकर्षण ठरणार आहे.

उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात आगरी- कोळी समाजाचे वास्तव्य आहे. यामुळे, अनेक गावात देवीच्या विविध रूपातील मंदिरे असून डोंगरी गावची अंबादेवी, करंजाची द्रोणागिरी माता, जसखार येथील रत्नेश्वरी मातेची मंदिरे प्रसिद्ध आहेत. तर, मोरा येथील कोळी बांधवांच्या श्रद्धेची कातळातील पौराणिक एकविरा माता आणि इंद्रायणी डोंगरावरील देवीचे मंदिर हे भक्तांनी फुलून जाते.

यामुळे, नवरात्रीच्या या उत्सवाच्यानिमित्ताने हजारो भाविक हे देवीचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून हजेरी लावताना दिसून येतात. यामुळे, या परिसराला यात्रेची स्वरूप येत असून दसऱ्याच्या निमित्ताने देवीची पालखी काढण्यात येत असल्याचे दिसून येत.

त्याचबरोबर, उरण तालुक्यात अनेक ठिकाणी देवीची स्थापना करण्यात येत असून उरण शहरातील गणपती चौकातील नवरात्रोत्सवाला सुमारे ५० वर्षांची परंपरा असल्याची माहिती मंडळाच्या रमेश ठाकूर यांनी दिली आहे. तर, जेएनपीटी वसाहतीत सांस्कृतिक मंडळामार्फत आयोजित नवरात्रोत्सवाला अनेक मराठी कलाकार उपस्थितीत लावीत असल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यातच, यंदा चिरनेर येथील नवरात्रोत्सव मंडळामार्फत साडेतीन शक्तीपीठाचा देखावा तयार करण्यात येणार असल्याने उरणकरांच्या आकर्षणाचे केंद्र बनणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे, नवसाला पावणाऱ्या आणि भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवीच्या दर्शनासाठी या उत्सवात मोठी गर्दी होणार हे निश्चित आहे.