उरण : वादळीवाऱ्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटी पैकी पाच बोटी भरकटल्या आहेत. या बोटी मासेमारी करून करंजा आणि इतर बंदराच्या दिशेने परतत असतांना ही घटना घडली आहे. त्यामुळे या बोटींवरील खलाशांचे जीव धोक्यात आले आहेत. रविवारी मुंबई पासून सातशे किलोमीटर अंतरावर वादळात सापडल्याने दोन बोटी बुडल्याची घटना घडली होती. या बोटीतील खलाशांना वाचविण्यात यश आले होते.
मात्र पुन्हा एकदा वादळी वारे वाहू लागल्याने मासेमारी करून परतणाऱ्या बोटीतील काही बोटी भर समुद्रात भरकटल्याचे इतर मासेमारी बोटीवरील खलाशांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्यांच्याशी बिनतारी संदेशाचा वापर करीत संपर्क केला मात्र तो होऊ शकला नाही.
याची माहीती मूळ मालकांना मिळताच त्यांनी करंजा मच्छिमार सहकारी संस्थेशी संपर्क साधला आहे. अचानकपणे बदललेल्या वातावरणामुळे मासेमारीसाठी रवाना झालेल्या बोटी माघारी परतल्या आहेत. मात्र काही बोटी खोलवर गेल्याने त्या मासेमारी करून परतत असतांना ही घटना घडली आहे. या संदर्भात करंजा मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर उरणच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी बागुलगावे यांनी अशी घटना घडल्याची पुष्टी देत माहीती घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.
करंजा परिसरातील पाच मच्छिमार बोटींशी संपर्क होत नसल्याचे करंजा मच्छिमार संस्थेच्या अध्यक्षानी कळविले होते. मात्र नंतर या बोटींशी संपर्क झाला असून त्या येत असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षांनी दिली असल्याची तसेच रायगड जिल्ह्यातून कोणत्याही प्रकारची बोट भरकटल्याची माहीती नसल्याचे मत मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त संजय पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मात्र तटरक्षक दलाला समाजमाध्यमातून भरकटलेल्या जहाजांना मदत व सहकार्य करण्याची विनंती करणारे संदेश पाठविले असून त्यात मासेमारी बोटींचीही माहीती देण्यात आलेली आहे.
समुद्र खवळलेला : गेल्या आठवडाभर समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे खराब हवामानात मासेमारी करणे धोक्याचे असल्याने अनेक बंदरातील हजारो बोटी मासेमारी न करताच परतल्या आहेत. या खराब वातावरणात मासेमारी करणे धोक्याचे ठरत आहे.
