उरण : वारंवार हवामानात होणारे बदल तसेच समुद्रातील वाढता मानवी हस्तक्षेप आणि जलप्रदूषणामुळे दिवसेंदिवस समुद्रातील माशांचा साठा कमी होत चालला आहे. त्यामुळे राज्याच्या ७२० किलोमीटर लांबीच्या सागरी जलाधिक्षेत्रात मुबलक मिळणारी मत्स्यसंपदा कमी झाल्यामुळे तिच्यावर उपजीविका करणाऱ्या लाखो मच्छीमारांना मागील काही वर्षांपासून मासळीच्या दुष्काळाशी झुंजावे लागत आहे. परिणामी लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढावले आहे.

सागरी मासेमारीला तर मुळातच अनेक मर्यादा आहेत. त्यातच समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्रजातींचे मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडत आहेत. तर काही प्रजाती स्थलांतर करीत आहेत. जागतिक तापमान वाढीमुळेही माशांसह समुद्रातील एकंदरीतच जीवसृष्टीवरच अनिष्ट परिणाम होत आहेत. अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये झीरो ऑक्सिजन झोन निर्माण झाले आहेत. त्यामुळे अशा भागांतून काही प्रजातींचे मासे इतरत्र स्थलांतरित होत आहेत. घोळ, जिताडा, शेवंड, बोंबील, मांदेली, कर्ली, कोळंबी, पापलेट, सुरमई तसेच खेकडे याचबरोबर इतर अनेक प्रजातींचे समुद्रातील अस्तित्व काही वर्षांपासून कमी झाले आहे. त्याचबरोबर बेकायदेशीर पर्ससीन, एलईडी मासेमारीच्या अतिरेकाचा मोठा परिणाम पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे.

हेही वाचा : नवी मुंबई: कारवाईनंतरही रोपवाटिका उभी, एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळील भूखंडावर पुन्हा अतिक्रमण

व्यवसायावर गंडांतर

●मासळीची घटती उत्पादकता आणि नौकांची कमी होणारी संख्या यामुळे मासेमारी व्यवसायावर गंडांतर आल्याचे फिशर काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी दिली आहे.

● लाखो रुपयांची गुंतवणूक करून खर्च केलेली रक्कमही वसूल होत नसल्याने मासेमारी नौका विकण्याकडे कल वाढत आहे.

●अनेक नैसर्गिक संकटांमुळे मासेमारीचे दिवस वाया जात आहेत.