पनवेल – पनवेल परिसरात जोरदार पावसामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाने दिला असताना, सोशल मीडियावर मात्र दिशाभूल करणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. तळोजा सबवेतील पाण्यात वाहन आणि प्रवासी अडकले असल्याचा दावा करणारा व्हिडिओ मोबाईलवर वेगाने पसरत असला तरी तो तळोजातील नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.  

पनवेल व तळोजा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. घरात राहून मोबाईलद्वारे हवामानाची माहिती घेताना अनेकजण सोशल मीडियावरून येणाऱ्या व्हायरल संदेशांना बळी पडत आहेत. याच दरम्यान तळोजा सबवेतील पाण्यात वाहन व प्रवासी अडकल्याचा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणावर पसरला आहे.या व्हीडीओमुळे अतितातडीचे कामासाठी घराबाहेर गेलेले तळोजातील नागरीकांच्या कुटूंबियांना चिंता वाटू लागली आहे. 

 प्रत्यक्षात संबंधित व्हिडिओविषयी पोलिसांकडे खात्री केल्यावर हा व्हीडीओ तळोजातील नसून, तो इतरत्र चित्रीत झाल्याचे समोर आले आहे. तळोजा आणि खारघरला जोडणारा सबवे मंगळवारी सकाळपासूनच पाण्याने भरला होता. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ तो वाहतुकीसाठी बंद केला. त्यामुळे या सबवेत वाहन अडकण्याची शक्यता नव्हती, अशी माहिती पुढे येत आहे. 

 या प्रकरणी तळोजा वाहतूक पोलीस ठाण्याची जबाबदारी सध्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांच्याकडे अतिरिक्त सोपविली आहे. पोलीस अधिकारी भोसले यांनी दिलेल्या माहितीनूसार  “सोशल मीडियावर फिरत असलेला व्हिडिओ तळोजा सबवेचा नाही. सकाळपासूनच सबवेत पाणी साचल्यामुळे तो बंद करण्यात आला आहे. वाहन किंवा प्रवासी अडकण्याचा प्रश्नच नाही.”सोशल मीडियावर अशा प्रकारे खोटे संदेश आणि व्हिडिओ पसरवून दिशाभूल केली जात असल्याने नागरिकांनी सत्यता पडताळूनच माहितीवर विश्वास ठेवावा, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.