पनवेल – तालुक्यातील चिंध्रण, कानपोली आणि महालुंगी गावांतील ग्रामस्थांचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) विरोधातील आमरण उपोषण सोमवारी आठव्या दिवशीही कायम असून, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अखेर गावातील महिलांनी जलकुंभावर चढून आंदोलनाचा निर्धार केला आहे. चिंध्रण ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपोषणाने आता तीव्र स्वरूप घेतले आहे.

एमआयडीसीकडून संपादित झालेल्या जमिनींची वाढीव दराने नुकसानभरपाई, प्रकल्पग्रस्तांना भूखंड आणि इतर लाभ तसेच न्यायालयीन प्रकरणांतील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग निवडला आहे. अनेक वेळा निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. अखेर ग्रामस्थांच्या संयमाचा अंत झाल्याने महिलांनी आंदोलनाचा अग्रभाग स्वतःकडे घेतला.

सोमवारी सकाळी काही महिलांनी गावातील पाण्याच्या जलकुंभ (टाकीवर) चढून ठिय्या आंदोलन सुरू केले. “जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही,” असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. या आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी झाली असून, पोलिसांनी खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवली आहे.

प्रशासनाकडून चर्चेचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असतानाच, महिलांच्या या धाडसी पावलामुळे सरकारकडे आता दुर्लक्ष करणे कठीण होईल, अशी ग्रामस्थांची भावना आहे.