३आरोग्याशी संबंधित अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होऊ शकतो. हजारो रुग्ण असलेल्या मोठमोठय़ा रुग्णालयांच्या व्यवस्थापनापासून ते घरातील किंवा वृद्धाश्रमातील वृद्धांच्या शुश्रूषेपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगी पडू शकते.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रुग्णालय व्यवस्थापनात मोठी क्रांती घडू शकते. केसपेपरपासून सुरू होणारा प्रवास भविष्यात पूर्णपणे पेपरलेस होईल. मुंबई महानगरपालिका हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन (एचएमआयएस) सिस्टीम नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रणालीची अंमलबजावणी २०२५ पासून त्यांच्या सर्व रुग्णालयांमध्ये करणार आहे. मुंबईकरांना मोबाईल अॅप आणि वेब पोर्टलद्वारे रुग्णालयांमध्ये त्यांच्या अपॉइंटमेंट्स बुक करता येतील. या प्रणालीत रुग्णाची नोंदणी केल्यानंतर रुग्णाला युनिक आयडेंटिटी क्रमांक मिळेल. रुग्णाच्या आरोग्य इतिहासाची नोंद एचएमआयएसमध्ये केली जाईल. याला इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड (ईएचआर) असे म्हणतात. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णाच्या आरोग्याची पूर्वीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर संगणकाच्या पडद्यावर दिसेल. रुग्णाच्या रोगांचे ट्रेंडदेखील कळू शकतील. या सर्व प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता हातभार लावू शकते. त्यामुळे रुग्ण तपासणीचा वेग वाढू शकतो. रुग्णालयात लाखो रुग्णांची प्रचंड माहिती असते. कृत्रिम बुद्धिमत्ता या विदेवर काम करून रुग्णाच्या प्रकृतीविषयीचा भविष्यातील अंदाज वर्तवू शकते.
टेलिमेडिसिनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता मदत करू शकते. खेडय़ापाडय़ांत, दुर्गम भागांत वैद्यकीय सुविधा नसतात. अशावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अधिपत्याखाली टेलिमेडिसीन सेवा मिळू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने दूरस्थ पद्धतीने रुग्णाला तपासून वैद्यकीय सल्ला देणे दुर्गम भागातील रुग्णांसाठी उपयुक्त आहे.
जिनोमिक्स तंत्रज्ञानाद्वारे जन्मजात जनुकीय आजार जन्माआधीच ओळखून त्यावर उपचार करता येऊ शकतात. इथेही कृत्रिम बुद्धिमत्ता मोलाची कामगिरी बजावू शकते. माणसाचा जिनोम हा तीन अब्ज न्यूक्लिओटाइड एकमेकांना जोडून बनलेला असतो. जिनोमच्या अभ्यासामध्ये प्रचंड विदा निर्माण होते. त्यामुळे ही विदा वापरून जन्मजात जनुकीय आजार ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आवश्यक ठरतो.
आरोग्यक्षेत्रात डॉक्टरांएवढाच महत्त्वाचा घटक म्हणजे औषध. नवीन औषध शोधून ते बाजारात येईपर्यंत दहा-बारा वर्षे लागतात आणि अब्जावधी रुपयांचा खर्च येतो. प्राण्यांवर आणि माणसांवर औषधांच्या चाचण्या कराव्या लागतात. येथेही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून येणारा खर्च आणि लागणारा काळ कमी करता येईल. भावी काळात माणसाची नैसर्गिक बुद्धिमत्ता आणि माणसानेच निर्माण केलेली कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाचे आरोग्य सुधारण्यास हातात हात घालून काम करतील आणि माणसाचे जीवन सुसह्य करतील यात शंका नाही!
– बिपीन देशमाने मराठी विज्ञान परिषद
