पालघर : राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन परियोजना अंतर्गत सातपाटी गावाला भूमिगत वाहिनीद्वारे विद्युत प्रवाह करण्याची यंत्रणा कार्यान्वित झाली असताना समुद्रकिनारी असलेल्या अन्य ३९ गावांना पुढील वर्ष दीड वर्षात अशाच पद्धतीद्वारे विद्युत प्रवाह मिळण्याची योजना मंजूर झाली आहे. त्यामुळे निमखाऱ्या वातावरणात जीर्ण होणाऱ्या विद्युत वाहिनी व उपकरणांमुळे सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येपासून नागरिकांना आगामी काळात दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वादळी वातावरणाच्या परिस्थितीत किनाऱ्यालगतच्या भागात विद्युत उपकरणे नादुरुस्त झाल्याने अनेक दिवस बाधित भाग अंधारात राहत असल्याचे तसेच दैनंदिन कामकाज बाधित होत असल्याचे दिसून आल्याने राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन परियोजना अंतर्गत भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. पालघर तालुक्यातील सातपाटी गावात या प्रकल्पाची अंमलबजावणी पावसाळ्यापूर्वी झाली अजून वादळी वातावरणात या योजनेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा : पालघर : अपघातांमध्ये मृत, कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या कामगारांचे कुटुंब नुकसान भरपाईपासून वंचित

याच योजनेचा भाग म्हणून पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अन्य ३९ गावांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून त्यासाठी १९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सातपाटीप्रमाणेच लघु दाब विद्युत वाहिन्या (११ केव्हीए वाहिन्या) या योजनेअंतर्गत टाकण्याचे काम हाती घेण्यात आले असून या कामासाठी सध्या निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या कामांसाठी निविदा अंतिम करून पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान या गावांमध्ये टप्प्याटप्प्याने कामे सुरू करण्याचे प्रस्तावित असून ही कामे वर्षभराच्या कालावधीत पूर्ण करण्याचे अपेक्षित आहे.

हेही वाचा : तब्बल साडेचार लाख झाडांवर कुऱ्हाड, मुंबईची तहान भागवण्यासाठी वाड्यात गारगाई पाणी प्रकल्प

सद्यस्थितीत किनारपट्टीच्या गावांमध्ये अनेक विद्युत खांब व विद्युत वाहिन्या जीर्ण व गंजलेल्या अवस्थेत असून त्यामुळे तांत्रिक बिघाड उद्भवत आहेत. तसेच वादळी परिस्थितीत विद्युत वाहिनी तुटण्याचे प्रकार अथवा विद्युत खांब पडल्यामुळे अपघात होऊन प्राणहानी झाल्याच्या घटना गेल्या काही वर्षात घडल्या आहेत. भूमिगत विद्युत प्रणालीमुळे विद्युत प्रवाह खंडीत होणाऱ्या अधिकांश कारणांवर नियंत्रण येणार असून अखंडित विद्युत पुरवठा मिळण्यास किनारपट्टीच्या गावांमधील नागरिकांना आशा निर्माण झाली आहे.

पालघर वीज मंडळाच्या विभागात राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन परियोजनेत समाविष्ट गावांचा तपशील उपविभागनिहाय पुढीलप्रमाणे:

  • पालघर उपविभाग- वडराई, शिरगाव
  • डहाणू उपविभाग- बोर्डी, झाई, बोरीगाव, घोलवड, नरपड, डहाणूगाव, चिखले, आंबेमोरा, खडीपाडा, बागपाडा
  • सफाळे उपविभाग- दातीवरे, खार्डी, केळवा, कोरे, डोंगरे, एडवन, मथाने, भाताने, उसरणी, दांडा खटाळी
  • बोईसर ग्रामीण उपविभाग- मुरबे, नांदगाव, आलेवाडी, नवापूर, दांडी, उनभाट, उच्छेळी, घिवली, कांबोडा, चिंचणी, वरोर, वाढवण, धुमकेत, अब्राहम, गुंगवाडा, तडीयाळे, धाकटी डहाणू
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 39 coastal villages form palghar to get power through underground cables in 199 crore project css