अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी नागरिक ताटकळत
पालघर : पालघर येथे नव्याने जिल्हा मुख्यालय उभारण्यात आले असून बाहेरगावाहून कामासाठी येणाऱ्या नागरिकांना संबंधित अधिकाऱ्याची एकाच कार्यालय संकुलात भेट होऊ शकेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र अलीकडच्या काळात सुरू असलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स अर्थात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकांच्या आयोजनामुळे जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी तसेच जिल्हा कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी वेगवेगळय़ा आभासी बैठकांमध्ये व्यग्र राहत असल्याचे दिसून आले आहे. आज दिवसभरात जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल पाच-सहा अशा बैठकांचे आयोजन झाल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्हा स्थापनेनंतर जिल्ह्याला भेडसावणाऱ्या समस्यांसाठी जिल्हाधिकारी यांना मंत्रालयात भेटी घेणे आवश्यक असते. त्या वेळी जिल्हाधिकारी दर मंगळवारी व आवश्यकतेनुसार आठवडय़ातून एक दिवस मुंबई किंवा कोकण भवन येथे कामानिमित्त दौऱ्यावर जात असतात. करोना संक्रमणानंतर प्रत्यक्ष भेटींची संख्या कमी झाली असून दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकांचे आयोजन वाढले आहे.
अशा बैठकांमध्ये जिल्हा पातळीवरील वरिष्ठ व महत्त्वाचे पदाधिकारी सहभागी होत असल्याने तसेच राज्यभराचा आढावा घेतला जात असताना हे अधिकारी तासन्तास अशा बैठकांमध्ये व्यग्र राहात असल्याने त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची कुचंबणा होताना दिसून येते. विशेष म्हणजे अशा दूरदृश्य प्रणालीद्वारे केल्या जाणाऱ्या बैठका नेमक्या किती वेळाने संपतील याचा अंदाज नसल्याने अधिकारी वर्गाची भेट घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना ताटकळत बसावे लागते. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आज सलग पाच ते सहा आभासी बैठकांचे आयोजन झाल्याची माहिती पुढे आली आहे. सकाळी प्रथम उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रथम करोना संक्रमणाचा आढावा घेतला. त्यानंतर मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणासंदर्भात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. त्यापाठोपाठ वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात मुख्य सचिवांची बैठक व त्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी कांदळवनसंदर्भातील विषयाच्या बैठकीचे आयोजन केले होते.
रस्ता सुरक्षासंदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक व सायंकाळी सिडकोसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकदेखील आयोजित करण्यात आली होती. याचबरोबरीने कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी बैठकीचे आयोजन केल्याचीदेखील माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी हा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दिवस म्हणून व्यग्र राहिल्याचे चित्र दिसून आले.