डहाणू तालुक्यातील काही भागात एक काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये काही लोक फिरत असून ते लहान मुलांना विविध आमिष दाखवून पळवण्याचा प्रयत्न करत असल्याची अफवा पसरली आहे. याविषयी कासा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांबरोबर चर्चा केल्यानंतर या वाहनातील नागरिक केंद्रशासित प्रदेशातील नागरिक असून ते निकावली येथे सप्तशृंगी मंदिरात आले असून त्याठिकाणी त्यांनी लहान मुलांना शाळेपयोगी वस्तू आणि खाऊचे वाटप केल्याची माहिती समोर आली आहे.
डहाणू तालुक्यातील सारणी गावात १४ जुलै रोजी एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वाहन वावरताना दिसले असून या वाहनांमधून काही व्यक्ती शाळेतील लहान मुलांना विविध प्रलोभन देऊन गाडीमध्ये घेऊन जाण्याचे प्रयत्न करत असल्याची अफवा सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली होती. पोलिस याची चौकशी केल्यानंतर घटना खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सारणी येथील घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ही घटना खोटी असल्याचे समोर आले असून अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अशा घटनांची माहिती शहानिशा केल्याशिवाय समाज माध्यमांवर प्रसारित करू नये असे आवाहन कासा पोलिसांकडून करण्यात आले आहे.