पालघर : पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू व जव्हार या तीन नगरपरिषद तसेच वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी होणारे मतदान तसेच ३ डिसेंबर रोजीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून निवडणूक होणाऱ्या नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या पालनाकडे लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक भरारी पथक कार्यरत झाले असून मतदान केंद्रनिहाय याद्या उद्या (६ नोव्हेंबर रोजी) प्रसिद्ध होणार आहेत.
या चारही निवडणूक ठिकाणी थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असून पालघर येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग, डहाणू येथे सर्वसाधारण उमेदवारांसाठी, जव्हार व वाडा येथे सर्वसाधारण महिला उमेदवारांसाठी आरक्षण यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे. पालघर नगर परिषदेच्या ३० सदस्यांसाठी शहरात ५५७२७ मतदार संख्या निश्चित झाली असून डहाणू नगर परिषदेच्या २७ सदस्यांना निवडून देण्याकरिता ३८६९३ मतदार आपला अधिकार बजावणार आहेत. याच बरोबरीने जव्हार नगर परिषदेच्या २० सदस्यांसाठी ९३४७ मतदार तर वाडा नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी १२८९३ मतदार पात्र ठरले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी घोषणा केल्याप्रमाणे मतदार यादीत दुबार नोंदणी असणाऱ्या मतदारांसमोर दोन स्टार नोंदी करण्यात येणार असून असे मतदार फक्त एकाच ठिकाणी मतदान करू शकतील यासाठी जिल्हा निवडणूक विभाग व जिल्हा प्रशासन उपायोजना राबवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी पत्रकारांना दिली. शहरी भागात होणाऱ्या निवडणुकीच्या ठिकाणा लगतच्या गावांमधील मतदारांना पुन्हा नव्याने जिल्हा परिषद निवडणुकीत मतदान करता येऊ नये यासाठी देखील जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान या नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रांसाठी मतदान केंद्रनिहाय यादी उद्या ७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
राज्य निवडणूक विभागाच्या परवानगीनेच पुरवणी यादी होणार प्रसिद्ध पालघर व इतर काही शहरांमधील मतदार यादी संदर्भात काही राजकीय पक्षांनी आक्षेप नोंदवला होता. मात्र प्रारूप मतदार यादीतील आक्षेपा विषयी नेमून दिलेल्या अधिकारी यांच्या समवेत झालेल्या सुनावणी दरम्यानचा निकाल अंतिम असून हा निकाल व प्रत्यक्षात प्रसिद्ध झालेल्या अंतिम यादीत काही ठिकाणी टायपिंग व डेटाएन्ट्री चुका तसेच डेटा संकलित करताना तांत्रिक मुद्द्यांमुळे काही दोष राहिल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. या संदर्भात प्रत्येक बाबींची पुनर पडताळणी करून काही ठिकाणी बदल करावयाच्या असल्यास त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी घेऊन पुरवणी यादीद्वारे हे बदल अमलात येतील असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. मतदार यादीत मधील माहिती व संख्या प्रमाणित असून त्यामध्ये विशेष बदल होणार नाही असे त्यांनी पत्रकारांपुढे सांगितले.
आचारसंहिता राखण्यासाठी भरारी पथक
जिल्ह्यातील चार शहरांमध्ये निवडणुकीची घोषणा ४ नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर आचारसंहिता सुरू झाली असून प्रत्येक निवडणुकीसाठी नेमून दिलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली भरारी पथक नेमून देण्यात आली आहेत त्यांच्यामार्फत कार्य सुरू झाले असून काही मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग अर्थात सीसीटीव्ही द्वारे देखरेख ठेवण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल असेही सांगण्यात आले. सर्व सामान्य नागरिकांना पंचायत निहाय तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले असून तक्रार निवारण कक्षांचे संपर्क क्रमांक जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केले आहेत.
पालघर नगरपरिषद : १८०० २३३ ००९८
डहाणू नगरपरिषद : १८०० २३३ १८१९
जव्हार नगरपरिषद : १८०० २३३ १२०१
वाडा नगरपंचायत : १८०० २३३ ११८०
ईव्हीएम संख्या पुरेशी
चार शहरांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत ५५ प्रभागात निवडणूक होणार असून त्याकरिता १२५ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. ईव्हीएम होणाऱ्या मतदान प्रक्रियेत जिल्ह्याकडे पुरेशा प्रमाणात कंट्रोल युनिट बॅलेट युनिट व मेमरी कार्ड पुरेशा प्रमाणात असल्याची माहिती देण्यात आली.
