पालघर : ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी नागरिकांच्या मनामधील सुखाची संकल्पना साकार होण्यासाठी पायाभूत सोयी व इतर आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवा तसेच राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये राज्यात अव्वल यावे अशी अपेक्षा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आज आयोजित करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी जिल्ह्यातील अनेक सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

या योजनेबद्दल माहिती देताना मनोज रानड यांनी ग्रामपंचायतीने चांगले काम करण्यासाठी प्रेरित व्हावे यासाठी या योजनेचे महत्त्व पटवून सांगत या योजनेच्या अंमलबजावणीद्वारे गावामध्ये विकासाची गंगा वाहावी अशी अपेक्षा व्यक्त केली. शासनाच्या विविध योजनांचा व अभियानांचा सार या योजनेत समाविष्ट करण्यात आला असून ग्रामीण भागाचा विकास साधने व बळकटीकरण करणे हे त्यामधील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे नमूद केले. १७ सप्टेंबर पासून या योजनेला प्रारंभ होणार असून ती ३१ डिसेंबर पर्यंत कार्यरत राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेत चांगली कामगिरी बजावणाऱ्या ग्रामपंचायतीचे गुणांकन जानेवारी २०२६ मध्ये केले जाणार असून विविध स्तरांवर भरघोस पुरस्कार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

जागतिक तापमानवाढ व इतर समस्यांविषयी ऊहापोह करताना पालकमंत्री गणेश नाईक यांनी पाच वर्षात राज्यात २५० कोटी झाडांची होणारी लागवड व बांबू लागवडीचे महत्त्व पटवून सांगितले. पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वच्छ सुंदर प्लास्टिक मुक्त व दुर्गंधीमुक्त पालघर करण्यात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने प्रभावीपणे कामगिरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी या योजनेच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी आपापसामधील वाद मिटवून एकत्रितपणे विकास साधण्याचे आवाहन केले. तसेच मनरेगा अंतर्गत अर्धवट अवस्थेत असणाऱ्या कामांना राज्य शासनाने रद्द केल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री यांना विनंती केली. आमदार राजेंद्र गावित यांनी गावांचे सक्षमीकरण करण्यासोबत विविध ठिकाणी होणारे अनधिकृत बांधकामावर अंकुश ठेवण्यासाठी मागणी केली.

पंचायत राज अभियानाविषयी

या अभियानात लोकाभिमुख प्रशासन करण्यासाठी नागरी सुविधांचा स्तर उंचावणे, तक्रार निवारण कक्ष प्रभावीपणे राबवणे, ग्रामपंचायतच्या दप्तराचे लेखापरीक्षण करणे, ग्रामसभेच्या व मासिक सभेचे इतिवृत्त संकेतस्थळावर उपलब्ध करणे, ग्रामपंचायतीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, स्वच्छ गाव हरित गाव संकल्पना राबवणे, विद्युत व इतर देयक नियमित भरणा करणे, स्थानिक स्वराज्य संस्थेतील हद्दीमधील सर्व शासकीय इमारतींमध्ये पाण्याचे पुनर्भरण करणे, सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करणे, ग्राम स्वच्छता अभियान राबवणे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे करणे, मनरेगा व इतर शासकीय योजनांचे अभिसरण करणे, शाळा अंगणवाडी येथील व्यवस्था नीट ठेवणे, शेतीपूरक उपक्रम राबवणे, संस्थांचे सक्षमीकरण करणे, धार्मिक स्थळांची नियमित देखभाल दुरुस्ती करणे, विविध योजनांमध्ये लोकसहभाग असणे तसेच नाविन्यपूर्ण योजना राबवणे अशा अनेक उपक्रमांचा सहभाग आहे.