पालघर : पालघर जिल्ह्यात येणारे प्रकल्प तसेच जिल्हा प्रशासन व सामाजिक संस्थांच्या मदतीने होणाऱ्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याचे स्वरूप पूर्वीसारखे राहणार नाही असे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. बांबू लागवडीमुळे बायोडिझेल व ब्रिकेट सारखी उत्पादन तयार होऊन हरित इंधन वापरण्याकडे देशात प्रयत्न सुरू असताना विविध विभागांमध्ये असणारी शासकीय वाहने विद्युत प्रणालीमध्ये रूपांतरित करण्यास जिल्हा अग्रेसर राहील असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सूतोवास केले.
पालघर येथे दोन व जव्हार पाठोपाठ पालकमंत्री यांच्या कारकीर्दीत चौथ्या जनता दरबारचे आयोजन विक्रमगड येथे आज (बुधवार) आयोजित करण्यात आले होते. प्रसंगी आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी २५० पेक्षा अधिक नागरिकांकडून समस्या विषयी निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी प्राप्त काही तक्रारींवर तातडीने निर्णय घेण्यात आले तर इतर काही प्रकरण संबंधित विभागाने किमान कालावधी हे प्रश्न सोडवण्याचे पालकमंत्री यांनी याप्रसंगी सुचित केलं.
विक्रमगड येथील जनता दरबारात नागरिकांनी दळणवळणासंदर्भात असणाऱ्या अडचणी प्रामुख्याने मांडून अनेक गावकऱ्यांना पावसात साकव व पुलाअभावी संपर्क तुटत असल्याकडे पालकमंत्री यांचे लक्षवेध झाले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, महावितरण वीजपुरवठा, रस्त्याची झालेली दुर्दशा तसेच विविध विभागा संदर्भात असणाऱ्या समस्यां संदर्भात निवेदन सादर केले.
राज्याने वृक्ष लागवडीचे महत्त्वकांक्षी उद्दिष्ट हाती घेतले असताना वनमंत्री पदाची जबाबदारी असताना पालकत्व असणाऱ्या पालघर जिल्ह्यात एक कोटी झाडे लावण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहणार असून या उपक्रमात जिल्ह्यात बांबू लागवड महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. जिल्ह्यातील उद्योगाला भेडसावणारे प्रश्न तसेच प्रदूषणाच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी दौरा करून आवश्यक उद्योगांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, पालघर घोटी सिन्नर राष्ट्रीय महामार्ग यांची अवस्था बिकट असल्याचे सांगून महामार्गांच्या यापूर्वी झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत केंद्र सरकारला घरचा आहेर दिला. जल जीवन मिशन अंतर्गत कामांचा दर्जा योग्य नसल्याचे सांगत या कामांमधील त्रुटींबाबत अहवाल सादर करण्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस स्टेशनचा विस्तार करणे आवश्यक असल्यास त्या संदर्भात अहवाल द्यावे असे सांगत शस्त्राशिवाय युद्धामध्ये विजय कोणी नाही असे सांगितले. बोईसर व परिसरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तसेच वृक्ष लागवड व इतर विकास कामांमध्ये उद्योगांमधील सामाजिक दायित्व फंडाचा वापर करून जिल्ह्यामध्ये अमुलाग्र बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
जनता दरबारचे आयोजन हे फक्त प्राप्त तक्रारींची संख्या नमूद करण्यासाठी नसून लोकशाही मध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी, प्रशासन व जनता यांनी हातात हात घालून काम करण्यासाठी समन्वय साधनांच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले.
भ्रष्टाचार, गैरप्रकार होऊ देणार नाही
यापूर्वी जिल्ह्यात झालेल्या विकास कामांचे लेखा परीक्षण करून गैरमार्गाने पैसे लाटण्याचा प्रयत्न अथवा दुबारकामांच्या माध्यमातून शासकीय निधीवर डोळा ठेवून बसलेल्या ठेकेदारांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाहीत असे सांगत आगामी काळात होणाऱ्या विकास कामात कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होऊ देणार नाही असे गणेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ठाणे जिल्ह्यात माझ्या श्रेणीचा नेता नाही – गणेश नाईक
गेल्या आठवड्यात आपला ७५वा वाढदिवस कार्यकर्त्यांनी साजरा केल्याचा उल्लेख करत लोकसभेत वय हे महत्त्वाचं नसते असे गणेश नाईक यांनी ठणकावून सांगितले. अनेक अधिकारी, राजकीय मंडळी वयाने तरुण असली तरी मनाने थकलेली असल्याने त्यांच्याकडून अपेक्षित काम होत असल्याचे सांगत या वयात देखील आपल्यातील काम करण्याची उमेद कायम असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले. आपल्या श्रेणी (रेंज) चा ठाणे जिल्ह्यात नेता नसल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगत शाब्दिक चकमकीला पुन्हा पालघर जिल्ह्यातून आरंभ केला.