पालघर : पालघर जिल्ह्यातील सर्व तरुणीला आगामी काळात सुजाण व सक्षम माता बनवण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये सिकल सेलचे निदान करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रायोगिक तत्वावर विक्रमगड व जव्हार या तालुक्यांमध्ये तरुणींची नियमित तपासणी हाती घेतली आहे. या तपासणीची व्याप्ती जिल्हाभर व्हावी तसेच जिल्ह्यातील सर्व आश्रम शाळांमधील मुलींची या दृष्टीने तपासणी करण्यासाठी जिल्हा व राज्य प्रशासन प्रयत्नशील राहील असेप्रतिपादन कुपोषण निर्मूलन व सांसर्गिक आजार टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी पालघर येथे केले.

कुपोषण निर्मूलन, बालमृत्यू, माता मृत्यू तसेच सांसर्गिक आजार याविषयी असणाऱ्या शासकीय टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी पुन्हा नव्याने १७ जून रोजी नेमणूक झाल्यानंतर डॉ. दीपक सावंत यांनी प्रथमच पालघर जिल्ह्याचा दौरा केला. वाडा येथील एका आश्रम शाळेत अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा उभारणे तसेच तेथील आरोग्य केंद्राला भेट देऊन त्यांनी विविध प्रश्नांची माहिती घेतली. आरोग्य विभाग तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी नंतर चर्चा करून कुपोषणाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली.

पालघर जिल्ह्यात असणाऱ्या सर्व १०८ आश्रम शाळांमध्ये तरुणींच्या वैद्यकीय तपासणी करण्यासाठी योजना आखण्यात आली असून मुलींचे विविध प्रश्न, तरुणींमध्ये येणारे नैराश्य व आत्महत्या होण्याचे प्रकार यासाठी आरोग्य सेविकांच्या मार्फत समुपदेशन व मार्गदर्शन करण्यासाठी व्यवस्था उभारण्यात येत असल्याची माहिती डॉ. दीपक सावंत यांनी दिली. राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेविका समन्वय आरोग्य अधिकारी (सी एच ओ) व सरपंच यांच्यामार्फत राबविली जाणारी पंचसूत्री पालघर जिल्ह्यात राबवली जात नसल्याबद्दल खंत डॉ. सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर व्यक्त केली.

जिल्ह्यातील वजन, उंची मोजमाप करणारी यंत्रणा अध्ययवत असली तरी सुद्धा त्यावर नियमित देखरेख ठेवणे हे आवश्यक असलयाचे त्यांनी प्रतिपादन आहे. तसेच खजेपणा व सोबत मुलींमधील हार्मोनल बदल याविषयी अभ्यास ठेवण्यासाठी स्वतंत्रपणे कार्यक्रम राबवण्याचे त्यांनी प्रस्तावित केले. जिल्ह्यात सन २००० च्या सुमारास गतवर्षाला ६५६ बालमृत्यू झाले होते. त्याचे प्रमाण विद्यमान वर्षी २१२ वर आले असले तरी तीन वर्षात बालमृत्यू वार्षिक १०० पेक्षा कमी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे त्यांनी सांगितले. सध्या प्रसूतीच्या जवळ आलेल्या महिलांवर देखरेख ठेवली जात असून जोखीम मातांची तपासणी व विशेष पद्धतीने स्कॅनिंग करणे तसेच माहेर योजना व इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा आरोग्य व्यवस्था प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या पालघर जिल्ह्यात ७७ अति तीव्र कुपोषित तर ८६३ मध्यम कुपोषित बालके असून हे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत घटले असले तरीही पालघर जिल्ह्याला कुपोषण निर्मूलन करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली. जनजागृतीसाठी देण्यात येणारे साहित्य व उपक्रम हे बोली भाषेत राबवावे तसेच पोषण आहारासाठी दिले जाणारे पदार्थ स्थानिक चव व आवडीनुसार तयार करण्याचा वे यासाठी आपण प्रयत्नशील जाऊ यासाठी देखील त्यांनी सांगितले. बाल वयात मुलींनी लग्न करू नये यासाठी त्यांचे प्रबोधन करणे तसेच सामाजिक संस्थांमार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समन्वय करण्याचे देखील आपण सुचवल्याचे डॉ. दीपक सावंत यांनी पालघर येथे पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.

आरोग्य संस्थांच्या उभारणीला प्राधान्य मिळावे

जिल्ह्यात मनोर येथे उभारण्यात येणारे ट्रॉमा सेंटर, पालघर जवळ उभारण्यात येणारे जिल्हा सामान्य रुग्णालय, खोडाळा ग्रामीण रुग्णालय तसेच वाडा ग्रामीण रुग्णालयाची उभारणी तातडीने व्हावी यासाठी निधीची उपलब्धता व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन लोक प्रतिनिधींसोबत आपण देखील प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी माहिती दिली.