मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दहिसर पासून गुजरात राज्याच्या सीमेवरील आच्छाडपर्यंत काँक्रिटीकरण करताना नियोजन व देखरेख ठेवून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेले आश्वासन फोल ठरले आहे. हे काम हाती घेण्यापूर्वी आवश्यक पूर्वतयारी झाली नसल्याने अनेक ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असून प्रवासाची वेळ सरासरी दुप्पट झाली आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांचे व नागरिकांचे अतोनात हाल होत असून जिल्हा प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचा १२१ किलोमीटर पट्ट्याचा भाग राज्यात येत असून या महामार्गावर पावसाळ्यात पडणारे खड्डे व त्यामुळे होणारे अपघात कमी व्हावेत या दृष्टिकोनातून सुमारे ५५३ कोटी रुपयांचा कॉंक्रिटीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला. प्रत्येक दिशेला असलेल्या तीन मार्गीकेवर पावसाचा कालावधी वगळता १६ महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याने दररोज दीड किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचे काँक्रिटीकरण करणे आवश्यक आहे. हे काम डिसेंबर अखेर सुरू झाले असून वर्सोवा पूल ते वसईपर्यंतचे काम पावसाळ्यापूर्वी संपविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा : दहिसर गोळीबाराचे राजकारण होऊ नये – मुख्यमंत्री

हे काम करण्यासाठी १२१ किलोमीटर रस्त्याच्या पट्ट्याचे सहा विभाग करण्यात आले असून सद्यस्थितीत प्रत्येक पट्ट्यात दररोज एका मार्गिकेचे सुमारे ४०० मीटर व एकूण अडीच किलोमीटर या गतीने काम सुरू आहे. या कामामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणाच्या पूर्वी वाहनांच्या मोठा रांगा लागत आहेत. काही ठिकाणी विरुद्ध बाजूने वाहनांचा शिरकाव होत असल्याने वाहतूक कोंडी होऊन एकाच ठिकाणी तासनतास वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत आहेत. पालघर येथून ठाण्याकरिता पूर्वी दीड ते दोन तासांचा अवधी लागत असे हाच कालावधी सध्या चार तासांच्या पुढे गेला असून उद्योगक्षेत्रात तसेच शासकीय सेवेत काम करणाऱ्या दैनंदिन प्रवासी व नागरिकांचे हाल होत आहेत.

या महत्त्वाकांक्षी कामाला आरंभ करण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गलगत असणाऱ्या सेवा मार्ग (सर्विस रोड)च्या सद्यस्थितीचा अभ्यास करणे आवश्यक होते. मात्र अपूर्ण असणाऱ्या तसेच सुस्थितीत नसलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करण्याचे टाळले. या सेवा रस्त्यांवरून स्थानिक गावांमध्ये जाण्याचे मार्ग असल्याने अशा रस्त्यांवर अनेक ठिकाणी गतिरोधक आहेत. या रस्त्यांचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करताना गतिरोधक निष्कासीत करण्याचे काम देखील दुर्लक्षित राहिले आहे.

हेही वाचा : पालघर : महामार्गाच्या काँक्रीटीकरण ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, पाच ते सहा किमी पर्यत वाहनांच्या रांगा

ठाणे, मुंबई येथील रस्त्यांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध असल्याने त्या अनुषंगाने कोणत्या वेळेत अवजड वाहनांचा वावर जास्त असतो याचा परिपूर्ण अभ्यास न केल्याने अवजड वाहनांच्या एकेरी मार्गीकेवरून प्रवास करताना वाहनांची मोठी रांग लागत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेताना वाहतूक वळविण्यासाठी (डायव्हर्शन) अनेक रस्ते उपलब्ध असताना शासकीय यंत्रणेशी योग्य वेळी समन्वय साधला न गेल्याने त्या रस्त्यांची दुरुस्ती हे काम हाती घेण्यापूर्वी झाले नसल्याचे दिसून आले आहे. परिणामी अवजड वाहनांना अशा पर्यायी मार्गांवरून पाठवणे देखील अशक्य झाले असून मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे गंतव्य स्थानी पोहोचण्यास अनिश्चितता निर्माण झाली आहे.

पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर महामार्ग पोलीस, पालघर पोलिसांची वाहतूक शाखा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, संबंधित ठेकेदार, वाहन चालकांचे प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या समवेत समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये वेगवेगळ्या शासकीय विभागाने सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अतिमहत्त्वाच्या मंडळींची वर्दळ जिल्ह्यात वाढली असून अशा प्रसंगी अनेकदा एका दिशेची वाहतूक रोखून ठेवणे हा पर्याय अवलंबला जात असल्याने परिस्थिती बिकट होताना दिसून येते.

हेही वाचा :बोईसरमध्ये वीजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू, दुसरा कामगार गंभीर जखमी

काँक्रिटीकरण प्रकल्प सुरू करून सव्वा महिन्याचा कालावधी उलटला असून सुमारे आठ टक्के काम पूर्ण झाले आहे. बोईसर चिल्हार पलीकडच्या भागात दोन मार्गीकांचे काँक्रिटीकरण एकाच वेळी हाती घेण्यात आल्याने त्या पट्ट्यात देखील वाहतूकीची परिस्थिती तितकीच बिकट आहे. काँक्रिटी केलेल्या भागावर १५ ते २० दिवस पाणी आच्छादन ठेवणे आवश्यक असल्याने पुढील काही महिने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर जिल्ह्यातील भागातून प्रवास हा कोंडीमय राहील हे निश्चित आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In palghar traffic jam on mumbai ahmedabad national highway due to concretization work css