पालघर : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे घडलेल्या साधू हत्याकांड प्रकरणात आपण पोलिसांच्या सोबत त्यांच्या मदतीला गेलो होतो. मात्र आपल्याला माध्यमानी व समाज माध्यमावर गुन्हेगार ठरवले जात असून त्याचा आपल्या कुटुंबीयाला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. आपले राजकीय भवितव्य उध्वस्त झाले तरी चालेल मात्र कुटुंब भरडले जाऊ नये या दृष्टीने आपण आपल्या मुला मुलीसाठी लढाई देत असल्याचे प्रतिपादन भाजपामध्ये प्रवेश केलेले जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशिनाथ चौधरी यांनी पालघर येथे सांगितले.
काशिनाथ चौधरी यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये व इतर पदाधिकाऱ्यांच्या समक्ष भाजपामध्ये प्रवेश घेतला होता. याविषयी विविध राजकीय पक्षांमधून टीका झाल्यानंतर त्यांच्या भाजपाच्या सदस्यत्वाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. याविषयी वृत्तपत्रांमध्ये, माध्यमांमध्ये तसेच समाज माध्यमांमध्ये उमटलेले पडसाद पाहून मुंबईत अभियांत्रिकी शिक्षण घेणारा आपला १७ वर्षीय मुलगा कोलमडून गेला असल्याचे सांगताना काशिनाथ चौधरी यांचा अश्रूंचा बांध फुटला.
आपण या प्रकरणात पोलिसांच्या विनंतीवरून त्यांच्यासोबत घटनास्थळी गेलो होतो व घडलेल्या घटनांचा तपशील पोलिसांना तसेच इतर तपास यंत्रणेला दिलेल्या जवाबात उल्लेखित आहे असे त्यांनी उपस्थित माध्यम प्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिले. साधू हत्याकांड हा विषय अत्यंत संवेदनशील असून आपले या हत्याकांडांशी संबंध जोडले जात असल्याचे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही तपास यंत्रणेच्या आरोपपत्रात आपल्याला आरोपी केले नसल्याचे त्यांनी सांगितले. तर या प्रकरणात आपण साक्षीदार असल्याने आपल्याला पोलीस संरक्षण दिल्याची त्यांनी माहिती दिली.
राजकीय धुराळा उडल्याने व आपल्याला गुन्हेगार ठरवले जात असल्याने त्याचा आपल्याला मानसिक त्रास होत असून कुटुंबीयांना देखील मोठ्या संघर्षमय वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. माझे राजकीय भवितव्य उध्वस्त झाले तरी चालेल पण मुलांसाठी व कुटुंबीयांवर परिणाम होऊ नये यासाठी आपण आपली भूमिका स्पष्ट करण्याच्या दृष्टीने पत्रकार परिषदेचे आयोजन केल्याची त्यांनी माहिती दिली.
स्थानीय भाजपा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण भाजपा पक्षात प्रवेश केल्याचा खुलासा त्यांनी करत प्रवेशापूर्वी तसेच भाजपा सदस्यत्वाला तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर कोणत्याही भाजपाच्या मोठ्या नेत्याशी चर्चा झाली नसल्याचा त्यांनी खुलासा केला. याप्रसंगी आपण कोणतेही राजकीय वक्तव्य करणार नसल्याचे सांगत मानवतेच्या दृष्टिकोनातून मदतीसाठी आपण गेले असताना आपल्याला धक्कादायक व चुकीच्या प्रकारे आरोप करून आपली बदनामी केली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यापुढे आपण भाजपाचा सामान्य कार्यकर्ता अथवा हितचिंतक म्हणून काम करत राहू व केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्नशील राहू असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
