पालघर: ग्रामीण विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पालघर जिल्ह्यातील आठ गावे ‘सुंदर गाव पुरस्कार’साठी निवडली गेली आहेत. यामध्ये पालघर तालुक्यातील कुरगाव हे गाव जिल्हास्तरीय सुंदर गाव म्हणून ठरले असून या ग्रामपंचायतीने ५० लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे.

४ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत आयोजित रोजगार मेळावा व सेवा पंधरवडा समारोप समारंभात हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी कुरगाव ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय ४० लाख आणि तालुकास्तरीय १० लाख, असे एकूण ५० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. हा पुरस्कार पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलिस अधीक्षक यतीन देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे उपस्थिती होते.

पालघर जिल्ह्यातील आठ गावांची ‘सुंदर गाव पुरस्कार’साठी निवड करण्यात आली असून या गावांना प्रत्येकी १० लाख रुपये बक्षीस देण्यात आले. यामध्ये पालघर तालुक्यातील कुरगाव, तलासरी तालुक्यातील आमगाव व आच्छाड, वाडा तालुक्यातील हमरापूर, विक्रमगड तालुक्यातील वसुरी, मोखाडा तालुक्यातील खोडाळा, वसई तालुक्यातील खानिवडे, जव्हार तालुक्यातील झाप व डहाणू तालुक्यातील घोलवड या गावांचा समावेश आहे.

पालकमंत्री गणेश नाईक यांनी पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचे अभिनंदन करून ग्रामविकासासाठी प्रोत्साहन दिले. तसेच या पुरस्कारामुळे ग्रामपंचायतींमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास व लोकसहभाग या उपक्रमांना नवी गती मिळणार आहे. तसेच निवड झालेली गावे इतरांसाठी आदर्श गावांचे प्रेरणा ठरतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.