पालघर : पहिलीपासून हिंदी या तिसऱ्या भाषेच्या सक्ती विरोधात पालघर जिल्ह्यातील नागरिकांचे जनमत तयार करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव समिती, त्यांची प्रश्नावली व एकूणच त्रिभाषा धोरणाच्या अनुषंगाने त्याविषयी उहापोह करण्यासाठी मराठीकरण परिषदेचे आयोजन १ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.
पहिलीपासून हिंदी या तिसऱ्या भाषेच्या सक्ती संदर्भात १६ एप्रिल रोजी राज्य शासनाने पहिला शासननिर्णय जारी केला होता. त्या पाठोपाठ एका वर्गात २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भारतीय भाषेची मागणी केल्यास त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी चालना देणारा सुधारित शासननिर्णय १७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. शासनाच्या या भूमिकेविरुद्ध स्तरांमधून तीव्र विरोध झाल्याने तसेच २९ जून रोजी आंदोलन छेडले गेल्याने शासनाने यापूर्वीचे निर्णय रद्द करून डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करून तीन महिन्यात त्या संदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या समितीने तयार केलेल्या प्रश्नावलीत अनेक प्रश्न हे हिंदी भाषेच्या सक्तीकडे झुकणारे असून काही प्रश्नांद्वारे अनावश्यक माहिती मागवण्यात आलेली आहे. शासन धोरण ठरवताना प्रश्नावली द्वारे जन्ममत आजमावण्याचा प्रयत्न करीत असून यामुळे मराठी संस्कृती संपवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत. डॉ. नरेंद्र जाधव समितीने केलेल्या नागपूर दौऱ्याच्या दरम्यान त्याला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. अशीच परिस्थिती राज्यात अन्य ठिकाणी होईल असे भाकीत शासनाच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या मंडळींनी केले आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने धोरण ठरवताना वाटचाल करावी व पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध दर्शवण्यासाठी तसेच नागरिकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी जिल्ह्यातील समविचारी मंडळी एकत्रित येऊन मराठीकरण परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहेत. शिक्षणाच्या विषयी धोरण ठरवताना तज्ञांचे मत महत्त्वपूर्ण असून राज्य सरकार चुकीच्या दिशेने पाऊल उचलत असल्याचे सांगत राज्य सरकार तिसऱ्या भाषेची पहिलीपासून सक्ती लादण्याच्या मागे राजकीय हेतू असल्याचे आरोप करण्यात आले.
पालघर पूर्वेच्या नवली येथील कै. गोविंदराव ठाकूर सभागृहात १ नोव्हेंबर रोजी दुपारी आयोजित या परिषदेत शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समितीचे डॉ. दीपक पवार, मराठी शाळांच्या सदिच्छादूत व अभिनेत्री चिन्मय सुमित, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व राज्याच्या सुकाणू समितीचे सदस्य प्रा. रमेश पानसे तसेच शिक्षण अभ्यासात गिरीश सामंत सहभागी होणार आहेत. या मराठीकरण परिषदेसाठी नागरिकांनी सहभागी व्हावी असे आवाहन सुशील शेजुळे, जितेंद्र राऊत, रमाकांत पाटील आदी मंडळींनी पत्रकार परिषदे द्वारे केली आहे.
