बोईसर : स्थानिक गुन्हे शाखेने बोईसर येथील सहारा हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.
पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांना बोईसर नवापूर नाका येथील सहारा हॉटेलमध्ये अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत बनावट ग्राहक पाठवून हॉटेलमध्ये अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खातरजमा केली. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास धाड टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केलेल्या तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांची रेस्क्यू फाउंडेशन मध्ये रवानगी करण्याबाबत कारवाई सुरू आहे. तर हॉटेल सहारामध्ये बेकायदा वेश्या व्यवसाय चालवल्या प्रकरणी व्यवस्थापक विनय जयकिसन धुपर याच्या विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर हे अधिक तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर, उपनिरीक्षक गोरखनाथ राठोड, पोलीस निरीक्षक कृष्णा ठाकरे, दीपक राऊत, संदीप सूर्यवंशी, कपिल नेमाडे, भगवान आव्हाड, प्रकाश महाले, राजेंद्र हरणे, मनोज राऊत, स्वप्निल जाधव, महिला पोलीस संजीवनी जाधव आणि सीमा भोये यांच्या पथकाने केली.