पालघर : जिल्हा परिषदेच्या ५७ जागांसाठी झालेल्या आरक्षणात मावळत्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांपैकी बहुतांश जणांना आरक्षणाचा फटका बसला आहे. तर किनारपट्टीच्या अनेक महत्त्वाच्या गटांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असणाऱ्या जागा महिलांच्या वाट्याला गेल्याने अनेक इच्छुकांच्या जिल्हा परिषदे मध्ये निवडून येण्याचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.
पालघर जिल्ह्यात एकूण १५ लक्ष ७० हजार ०८४ लोकसंख्या असून त्यापैकी २७ हजार १६५ नागरिक हे अनुसूचित जाती चे तर १० लाख पाच हजार ६९४ नागरिक हे अनुसूचित जमाती चे असल्याचे दिसून आले. जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागांचे आरक्षण करण्यात आले असून अनुसूचित जातीसाठी एक, अनुसूचित जमातीसाठी ३७, नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी १५ जागा तर महिलांकरिता एक जागा आरक्षित करण्यात आली.
सन २०२५ च्या शासन निर्णयानुसार या निवडणुका नव्याने आयोजित होत असल्याचे गृहीत धरून आरक्षणाची आखणी करण्यात आली. अनुसूचित जाती गटासाठी अलट पालट पद्धतीने व अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला जागा ठरवण्यासाठी ठिकाणी चिठ्ठ्या काढून सर्वसाधारण आरक्षण व महिलां करिता आरक्षण निश्चित करण्यात आले.
आरक्षण सोडत कार्यक्रम आज दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड होत्या. उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रणजीत देसाई यांनी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सहकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे राबविला.
प्रस्थापितांना धक्का
जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष प्रकाश निकम यांची तारापूर ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आली, तर मोखाडा तालुक्यातील तीनही जिल्हा परिषद गट अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने त्यांची पंचाइत झाली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष वैदही वाढाण यांचा दांडी गट नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी राखीव झाला असून त्यांच्या निवासाच्या लगत पास्थळ गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे.
जिल्हा परिषदेचे मावळते सभापती मनीषा निमकर यांचा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग, संदेश ढोणे व संदीप पावडे यांचे गट अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी राखीव झाल्याने त्यांना देखील नवीन जिल्हा परिषद गटांचा शोध घ्यावा लागणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशिनाथ चौधरी यांना महिला आरक्षणाचा फटका बसला आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा थेतले व मावळते अध्यक्ष पंकज कोरे यांच्यासाठी काहीशी अनुकूलता दिसून आली आहे.
बंदरपट्टीची दांडी, केळवा, माहीम, एडवण अर्नाळा किल्ला या गटांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी उमेदवारांसाठी राखीव असून औद्योगीकरणा मुळे विकसित झालेल्या खैरापडा, बोईसर या ठिकाणी देखील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण खुल्या गटात बोईसर जवळील सरावलीची जागा देखील महिलांसाठी राखीव असून अनेक महत्त्वपूर्ण जागांवर आरक्षण पडल्याने इच्छुक उमेदवारांकरिता आरक्षण सोडत विशेष फलदायी ठरली नसल्याचे दिसून आले आहे.
गट निहाय आरक्षण
अनुसूचित जाती (महिला): पास्थळ
अनुसूचित जमाती : बिनवड, आंबेसरी, उपलाट, वसा, चारोटी, कैनाड, दाभोण, वडवली, कुर्झे, वरसाळे, आशागड, मलवाडा, हालोली, बोर्डी, धुकटण, सरावली, भाताणे, गालथरे
अनुसूचित जमाती (महिला): वावर, झाप, जव्हार ग्रामीण, दादडे, मोडगाव, तलवाडा, सूत्रकार, चळणी, बऱ्हाणपूर, खोडाळा, डोंगारी, आंबोली, शिगाव, आसे, पोशेरा, आलोंडा, भिसेनगर, गांधरे, खानिवली
नागरिकांचा मागास प्रवर्ग : सातपाटी, कुडूस, मनोर, तारापूर, बोईसर वंजारवाडा, चंद्रपाडा, चिंचणी
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : दांडी, एडवण, खैरापाडा, केळवा, उंबरपाडा नंदाडे, बोईसर, माहीम, अर्नाळा किल्ला
सर्वसाधारण महिला : सरावली खुला (सर्वसाधारण) : कळंब, धाकटी डहाणू, खुपरी