पालघर : केंद्र सरकारने मासेमारी संदर्भात घोषित केलेले विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन संदर्भात अधिसूचना जारी केली असून १२ सागरी मैल अंतरापलीकडे मासेमारी करणाऱ्या बोटीच्या खलाशांना क्यूआर कोड ओळखपत्र बाळगणे आवश्यक करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील सुमारे ७५०० खलाशांसाठी अशी ओळखपत्र तयार करण्याची व्यवस्था उभारण्याचे काम मत्स्यव्यवसाय विभागाने हाती घेतले असून राज्य शासनाकडून यासंदर्भात सूचना प्राप्त होण्याची प्रतीक्षा आहे.

मासेमारी क्षेत्रात नवीन नियमावली जारी करण्यात आली असून या नियमावलीत पारंपारिक मासेमारी करिता बाधक ठरणारी एलईडी द्वारे मासेमारी करणे तसेच रोलिंग पद्धतीच्या मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. ई ई झेड क्षेत्रामध्ये मासेमारी करताना संबंधित बोटींवर मोठ्या जहाजांवर असणाऱ्या ट्रान्सपाँडर प्रमाणे यंत्रणा बसवणे देखील आवश्यक झाले असून मासेमारी बोटींवर असणाऱ्या खलाशांकरिता क्यूआर कोड असलेले ओळखपत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यात २१०० मासेमारी बोटी असून त्यापैकी १८२५ बोटींनी मासेमारी करिता यंदाच्या हंगामात मत्स्यव्यवसाय विभागाकडून परवाने घेतले आहेत. १२ सागरी मैल अंतराच्या पुढे मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या बोटीने असे परवाने बंधनकारक करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यात खोल समुद्रात (१२ सागरी मैल आंत रपलीकडे) मासेमारी करणाऱ्या सहा सिलेंडर असणाऱ्या ७२१ बोटीने मासेमारी करिता परवाने घेतले असून प्रत्येक बोटीवर असणाऱ्या १० ते १४ खलाशाची संख्या पाहता जिल्ह्यातील साडेसात हजार पेक्षा अधिक खलाशांना अशी ओळखपत्र देणे बंधनकारक ठरणार आहे.

केंद्र सरकारने जारी केलेली नियमावली च्या अनुषंगाने राज्य सरकार मासेमारी जिल्ह्यांच्या मत्स्यव्यवसाय विभाग कार्यालयात सविस्तर सूचना पाठवणार असून क्यूआर कोड ओळखपत्र तयार करण्यासाठी प्रणालीची उभारणी करण्यासाठी पालघरचे सहाय्यक आयुक्त मत्स्यववसाय विभागाने तयारी सुरू केल्याची माहिती पालघरची सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त दिनेश पाटील यांनी लोकसत्ताला दिली. राज्य सरकारकडून सूचना प्राप्त झाल्यास अशी ओळखपत्र लवकरात लवकर देण्याची तयारी आपल्या कार्यालयातून झाल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

ओळखपत्रांचे बदलते स्वरूप

पूर्वीच्या काळी मासेमारी बोटींवर काम करणाऱ्या कलाशांना स्थानिक कार्यालयातून ओळखपत्र दिले जात असे. देशावर समुद्र मार्गाने झालेल्या हल्लाखोरांची पार्श्वभूमी पाहता नंतर खलाशांकरिता स्मार्ट कार्ड प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. त्यानंतर क्यूआर कोड असणारे आधार कार्ड खलाशांना मासेमारीसाठी जाताना बोटीवर सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले होते. यापुढे अधिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून क्यूआर कोड असणारे ओळखपत्र मत्स्य व्यवसाय विभागाकडून दिले जाणार आहे.