पालघर : पालघर येथील गणेश कुंड व नवली तलाव येथे गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या छटपूजे दरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माल्य व इतर कचरा जमा झाला होता. मंगळवारी पहाटे या पूजेचे समापन झाल्यानंतर दिवसभरात नगर परिषदेकडून गणेशकुंड व नवली तलाव मिळून दीड टन निर्माल्य संकलित करण्यात आले असून विसर्जन घाटांचा परिसर स्वच्छ व निर्माल्यमुक्त करण्यात आला.
पालघर नगरपरिषद क्षेत्रातील विसर्जनाकरिता मुख्य स्त्रोत असलेल्या गणेश कुंड येथे मोठ्या प्रमाणात छटपूजा करण्याकरिता उत्तर भारतीय महिला दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत लहान मुलं, पुरुष मंडळी व नातेवाईक मोठ्या संख्येने होते. सोमवारी सायंकाळी चार वाजता पासून सुरू झालेल्या या पूजेदरम्यान भाविकांनी रात्री उशिरापर्यंत गणेश कुंड व नवली तलाव येथे पूजा केली. त्यानंतर मंगळवारी पहाटे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांवर्गांची गर्दी झाली होती. मात्र मंगळवारी सकाळी पूजा संपल्यानंतर परिसरात पूजेचे साहित्य, हार फुल, प्रसादाचे साहित्य व इतर कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला होता.
पालघर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी छटपूजेचे नियोजन करण्यापूर्वीच आरोग्य विभागाला स्वच्छतेबाबत विशेष सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पूजेचे समापन झाल्यानंतर आरोग्य विभागाचे भूषण काबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून दीड टन निर्माल्य व इतर कचरा संकलित करण्यात आला. यावेळी पाण्यात विसर्जित करण्यात आलेले निर्माल्य देखील वेगळे करण्यात आले.
गणेश कुंड व नवली तलाव येथे गणेशोत्सव व छटपूजे दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे त्वरित स्वच्छता करून परिसर स्वच्छ करणे व दुर्गंधी मुक्त करणे आवश्यक असतो. तसेच गणेश कुंडाच्या मध्यावर असलेल्या शिव मंदिरात सकाळी व सायंकाळी भावीक दर्शनाला व निवांत बसण्याकरिता किंवा शतपावली करण्याकरिता येत असून हा परिसर स्वच्छ ठेवण्याकडे नगर परिषदेचा अधिक कल असतो.
