डहाणू : तलासरी तालुक्यातील वेवजी येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या केल्याचा प्रकार शुक्रवार ३१ जानेवारी रोजी उघडकीस आला आहे. अशोक धोडी बेपत्ता झाल्यानंतर तब्बल १२ दिवसांनी त्यांचा तपास लागला असून गुजरात मधील भिलाड नजीकच्या सरिगाम येथील एका बंद दगड खडणीत त्यांच्या वाहनासह मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांचे भाऊ अविनाश धोडी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्यामुळे त्यांच्यातील वयक्तिक वादातून (पूर्ववैमनस्यातून) अशोक धोडी यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
तलासरी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी २० जानेवारी रोजी मुंबईला कमनिमित्त गेले होते. तिथून परतत असताना त्यांनी घरी फोन करून जेवायला येतो असे सांगितले. त्यांनतर घोलवड वरून त्यांच्या घरी वेवजी येथे परतत असताना त्यांच्या वाहनासह त्यांचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणी कुटुंबीयांनी घोलवड पोलीस ठाण्यात धाव घेत ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. अनेक दिवस उलटून देखील अशोक धोडी यांचा तपास लागत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी संशयितांच्या नावे गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर संशयित अविनाश धोडी (वेवजी – तलासरी) मनोज राजपूत (सरीगाम – गुजरात) आणि सुनील धोडी (जामशेत – डहाणू) या तीन जणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तीनही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत तपास सुरू केल्यानंतर यातील अविनाश धोडी आणि अन्य एक आरोपी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याचे समोर आले होते. यामुळे अशोक धोडी यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. अखेर अटक संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार तपासात तब्बल १२ दिवसांनंतर अशोक धोडी यांचा पत्ता लागला असून त्यांच्या मृहदेह गुजरात मधील सरिगाम येथे त्यांच्या वाहनामध्ये मागच्या बाजूला त्यांचा दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली असून अशोक धोडी यांच्या कुटुंबियांकडून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
© The Indian Express (P) Ltd