पालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर उपाययोजना करण्याबाबत बैठक आयोजित केली होती. यामध्ये ग्रामीण भागात सतत खंडित होणारा वीज पुरवठा, विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र यांची झालेली दूरवस्था, वायरमन कर्मचाऱ्यांचा अभाव अशा अनेक विषयांवर महावितरणचे अभियंता व ग्रामीण भागातील नागरिकांनी चर्चा केली.

पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत ३० जून रोजी महावितरणचे कार्यकारी, उपकार्यकारी अभियंता, ग्रामस्थ, सरपंच यांच्यामध्ये बैठक पार पडली. यावेळी डहाणूसह चिंचणी, वाणगाव, बोईसर, कासा या भागातील गोवाडे, रणकोळ, सातपाटी, धाकटी डहाणू, वाडापोखरन, दाभोण, देधाडे, मुरबे, नांदगाव, नवापूर, गंजाड, मुरबाड, वांगर्णे, तारापूर, उर्से, सारणी, भोईपाडा, दापचारी, धानीवरी अशा अनेक गावपाड्यातील ग्रामस्थ या बैठकीत उपस्थित होते. यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विजेच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसापासून ग्रामीण भागात सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. यासह अनेक ठिकाणचे विद्युत खांब जीर्ण झाले आहेत, विद्युत तारा लोंबकळत आहेत, विद्युत रोहित्र उघडी व नादुरुस्त अवस्थेत आहेत, विद्युत रोहित्रांच्या भोवताली संरक्षण कुंपण नाही, रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा नसल्याने सर्पदंशच्या घटना घडतात, समुद्रकिनारी भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम अद्याप रखडले आहेत, एका फिडरवर अधिक दाब येत असल्याने वारंवार वीज जाते अथवा धीमी असते, बिघाड झाल्यानंतर बराच वेळ वायरमन येत नाही, अनेक ठिकाणच्या झाडांच्या फांद्या-अद्याप छाटलेल्या नाहीत, नियमित बिल भरून देखील अव्वाच्या सव्वा दर लावले जातात अशा अनेक प्रश्नांचा पाढा या बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी वाचला.

महावितरण कडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला जिल्ह्यातील नागरिकांचा विरोध असून महावितरणने स्मार्ट मीटर नागरिकांवर लादु नये अशा सूचना शिवसेनेचे कुंदन संखे यांनी संबंधित अभियंता यांना दिल्या.

नागरिकांचे प्रश्न

  • दापचरी धानीवरी अशा अनेक भागात वारंवार वीज खंडित होत असल्याने डायमेकर व्यावसायिकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
  • खाऱ्या वाऱ्यामुळे समुद्रकिनारी गावांमधील विद्युत तारा जीर्ण झाल्या असून समुद्रकिनाऱ्यापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्ह्यातील ३९ समुद्रकिनारी गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या लवकरात लवकर टाकण्यात याव्या.
  • ग्रामीण भागात शेतीच्या कामादरम्यान अथवा पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याने सर्पदंशाच्या घटना घडत असतात. ज्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे.
  • लोकवस्ती अधिक असल्यामुळे काही ग्रामीण भागात सिंगल लाईनमुळे होणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून सिंगल लाईनऐवजी थ्री फेज लाईन टाकण्यात यावी
  • विजेअभावी मोटारी बंद पडतात, ज्यामुळे पिकांना पाणी मिळत नाही आणि शेतीचे मोठे नुकसान होते.
  • छोटे व्यावसायिक, डायमेकर, वेल्डिंग करणारे कारागीर, गृह उद्योग चालवणाऱ्या महिला यांना वीज नसल्याने काम करता येत नाही, ज्यामुळे त्यांची आर्थिक उलाढाल थांबते.
  • अनेक ठिकाणी पाणीपुरवठा हा विजेवर अवलंबून असल्याने वीज नसताना पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. तसेच इंटरनेट सुविधा विना कागदपत्रांची कामे रखडतात.
  • दाबातील चढ-उतार कमी किंवा जास्त दाबाने वीज आल्यास घरातील उपकरणे खराब होण्याची शक्यता असते.
  • अनेक ठिकाणी जुन्या आणि उघड्या तारा किंवा जीर्ण झालेले विजेचे खांबामुळे अपघातांचा धोका वाढतो. विशेषतः पावसात किंवा वादळी वाऱ्यात हे अधिक धोकादायक ठरते.
  • वीज गेली किंवा बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी कर्मचारी वेळेवर न पोहोचल्याने नागरिकांना दीर्घकाळ अंधारात राहावे लागते.

प्रत्येक फिडरला १० मनुष्यबळ

विद्युत पुरवठा खंडित झाला अथवा इतर महावितरणच्या कामाकरिता एका फिडर साठी दहा वायरमन नेमून दिलेले असतात. यामध्ये तीन विभागाचे तर सहा किंवा सात हे कंत्राट तत्वावर काम करत असतात. तरी काही ठिकाणी यापेक्षा कमी मनुष्यबळ असून वीज पुरवठा सुरळीत होण्यास विलंब होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

बोईसर ग्रामीण व सरावली विभक्त करणार

बोईसर ग्रामीण व सरावली सेक्शन एकत्र असल्याने या भागातील आवाका मोठा असून दाब येऊन या भागात अनेकदा पुरवठा खंडित होतो. तसेच मनुष्यबळ देखील कमी असल्याने बोईसर ग्रामीण व सरावली सेक्शन वेगवेगळे केल्यास प्रत्येकी १० वायरमेन या भागात उपलब्ध करून देण्यात येतील.

जंगलपट्टीतील भागात सिंगल लाईन पूर्णपणे काढून थ्री फेज लाईन करणार आहे. मनुष्यबळाचा अभाव असून उपलब्ध वायरमनद्वारे त्वरित त्या भागात काम करण्यात येते. ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्यांवर पाहणी करून लवकरात लवकर उपायोजना करण्यात येईल. – सुनील भारंबे, कार्यकारी अभियंता महावितरण

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील लोकांना प्राधान्य दिले पाहिजे. संबंधित विभागीय अभियंता यांनी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची पाहणी करून त्याची दुरुस्ती करावी. – राजेंद्र गावित आमदार