पालघर : महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करणे तसेच केंद्र सरकारतर्फे महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबवले जात आहे. पालघर जिल्ह्यातील महिला व मुलांनी या आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी जवळच्या आयुष्मान आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र किंवा अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनांकडून करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या अभियानासोबतच आठवा राष्ट्रीय पोषण महिना १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर देखील आरोग्य विभागाच्या समन्वयाने सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये साजरा केला जात आहे. हे अभियान महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चालवले जाणार आहे. यामध्ये लठ्ठपणा कमी करण्यासाठी, मुलांसाठी योग्य आहार आणि स्थानिक आहाराचा समावेश यावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत आहार आणि शिक्षणाचे महत्त्व सांगितले जाणार असून मुलांच्या संगोपनात पुरुषांच्या भूमिकेवरही मार्गदर्शन केले जाणार आहे.

अभियानांतर्गत पूरक आहार पाककृती प्रदर्शन, पोषण शपथ आणि ॲनिमियाबद्दल जनजागृती केली जाणारा आहे. यासह महिलांसाठी विविध वैद्यकीय तपासण्या मोफत उपलब्ध असतील, ज्यात रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर (स्तन, गर्भाशय आणि तोंड), प्रसूतीपूर्व तपासणी, क्षयरोग, एचआयव्ही, दंत तपासणी, टीबी, सिकल सेल आणि ॲनिमिया यांचा समावेश आहे. आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी साखर आणि तुपाचे कमी सेवन करण्यासह स्थानिक व पारंपरिक आहारावर भर दिला जाणारा आहे. तसेच योगासन, मानसिक आरोग्य समुपदेशन आणि टेक होम रेशन (THR) वाटप यांसारख्या सेवा देखील उपलब्ध आहेत.

नागरिकांच्या सहभागाची अपेक्षा

अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. रक्तदान शिबिरे, नियमित आरोग्य तपासणीसाठी नोंदणी आणि अंगणवाडी स्तरावरील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर यांनी सांगितले आहे. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी महिला व मुलांनी या आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी जवळच्या आयुष्मान आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र किंवा अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

अपंग प्रमाणपत्रांकरिता शिबीर

ग्रामीण रुग्णालय, मोखाडा – १९ सप्टेंबर

उपजिल्हा रुग्णालय, डहाणू – २० व २३ सप्टेंबर

ग्रामीण रुग्णालय, वाडा – २२ सप्टेंबर

ग्रामीण रुग्णालय, तलासरी – २४ सप्टेंबर

ग्रामीण रुग्णालय, विक्रमगड – २४ सप्टेंबर

ग्रामीण रुग्णालय, वाणगाव – २५ सप्टेंबर

उपजिल्हा रुग्णालय, जव्हार – ३० सप्टेंबर

ग्रामीण रुग्णालय, विरार – ३० सप्टेंबर

उपजिल्हा रुग्णालय, कासा – २ ऑक्टोबर