पालघर : समाजामध्ये एकीकरण करण्यासोबत तरुण पिढीमध्ये राष्ट्रवादाची भावना पुनर्जीवित करण्यासाठी वंदे मातरम उपयुक्त असून या राष्ट्रगीताचे नियमित गायन करायला हवे असे प्रतिपादन पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी केले.

“वंदे मातरम्” या गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधिक्षक यतिश देशमुख, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी रविंद्र राजपूत, उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई, उप जिल्हाधिकारी (रोहयो) विजया जाधव, उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण तसेच वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि आयटीआय व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

वंदे मातरम् हे एक गीत नसून भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा आत्मा आहे. या गीताच्या प्रत्येक ओळीमध्ये भारताच्या एकात्मतेचा, बलिदानाचा आणि मातृभूमीप्रेमाचा संदेश असून वंदे मातरम् हे गीत स्वातंत्र्याच्या भावनेचा शक्तिस्रोत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले. तरुण पिढीला भारतीय स्वातंत्र्यचा इतिहास समजायला पाहिजे तसेच पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाची माहिती समजायला हवी असेही त्यांनी पुढे सांगितले.

“हा कार्यक्रम म्हणजे केवळ स्मरण नव्हे तर देशभक्तीच्या भावनेचा पुनर्जन्म आहे. मुलांमध्ये देशप्रेम आणि एकात्मतेची भावना जागृत करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण समाजाला परत काय देणे लागतो, याची जाणीव या निमित्ताने व्हावी, हाच या उपक्रमाचा हेतू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी एकलव्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लघुनाटिकेने आणि वंदे मातरम् गीताच्या सामूहिक गायनाने उपस्थितांमध्ये एक विशेष देशभक्तीची ऊर्जा निर्माण झाली. तर पंकज भरवाड यांनी वंदे मातरम याविषयी पार्श्वभूमी व इतिहास सांगितला.

तरुणांपर्यंत माहिती पोहोचावी

बऱ्याचदा आपण वंदे मातरम् या गीताच्या सुरुवातीचे शब्द ओळखतो, पण पूर्ण गीताचा अर्थ, इतिहास आणि भावना आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. उद्देशही हाच आहे की आजच्या तरुणांना स्वातंत्र्य लढ्याचा आणि आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचा इतिहास समजला पाहिजे बंकीमचंद्र चटोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘आनंदमठ’ कादंबरीतील या गीताचा ऐतिहासिक संदर्भही जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी उपस्थितांना सांगितला. त्यांनी नमूद केले की, “वंदे मातरम् हे १८९६ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी काँग्रेस अधिवेशनात गायले, तर १९०५ मध्ये बंगाल फाळणीविरोधी आंदोलनाचे ते प्रमुख प्रतीक बनले. मॅडम भिकाजी कामा यांनी परदेशात प्रथम तिरंगा फडकवताना ‘वंदे मातरम्’ हेच शब्द ध्वजावर लिहिले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९५० मध्ये संविधान सभेत निवेदन दिले आणि तत्कालीन राष्ट्रपती यांनी या गीताला राष्ट्रगीत जन गण मन प्रमाणेच दर्जा असेल आणि या गीताचा तितकाच मान व सन्मान केला जाईल असे सांगितले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.