-
प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं आज (१६ फेब्रुवारी २०२२ रोजी) निधन झालं आहे.
-
मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६९ वर्षांचे होते. बप्पी लहरी यांच्या निधनासंदर्भात अनेकांनी सोशल मीडियावरुन शोक व्यक्त केलाय.
-
भारतीयांना डिस्को गाण्यांची ओळख करुन देणारा आणि त्याबद्दल प्रेम निर्माण करणारा संगीतकार आपल्यातून निघून गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलीय.
-
बप्पीदा नावाने लोकप्रिय असणारे बप्पी लहरी हे त्यांच्या गाण्यांबरोबरच कपडे आणि सोन्याच्या दागिण्यांबद्दल असणाऱ्या आवडीसाठीही चर्चेत असायचे.
-
मात्र बप्पीदा एवढं सोनं का घालायचे? त्यांच्याकडे नक्की किती सोनं होतं? त्यांची संपत्ती कितीय यासंदर्भात अनेकजण आता इंटरनेटवर माहिती सर्च करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या या सोन्याच्या दागिण्यांवरील प्रेमाचा घेतलेला आढावा…
-
बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे त्यांच्या कलागुणांसोबतच हटके फॅशन सेन्ससाठी ओळखले जातात. असे काही मोजके कलाकार वेगवेगळ्या पिढ्यांसाठी ट्रेण्ड सेटर ठरतात. अशाच कलाकारांमध्ये प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचा देखील समावेश होता.
-
बप्पीदांना त्यांच्या गाण्यांनी अनेकांची मने तर जिंकलीच पण त्याचसोबत त्यांचे सोन्यावरील प्रेम हे देखील सर्वांसाठी कुतुहलाचा विषय ठरायचा.
-
बप्पीदांच्या अंगावर कायम सोन्याचे दागिने असायचे. पण ते एवढे दागिने का घालायचे याबद्दल त्यांनीच एकदा खुलासा केला होता.
-
बप्पीदांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ साली पश्चिम बंगालमध्ये झाला. वयाच्या २१ व्या वर्षापासून ते बॉलिवूडमधील चित्रपटांना संगीत देऊ लागले. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगीत देत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. मात्र १९७६ साली आलेल्या ‘चलते-चलते’ या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र बप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढू लागली आणि त्यांच्या सोन्याच्या दागिण्यांबद्दची चर्चाही!
-
बप्पीदांनी ‘नमक हलाल’, ‘शराबी’, ‘हिम्मतवाला’, ‘साहेब’, ‘गुरू’, ‘घायल’, ‘रंगबाज’ या चित्रपटांनाही संगीत दिलं. विशेष म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेसोबतच त्यांच्या सोन्याचा दागिन्यांचीही चर्चा होऊ लागली.
-
सामान्यपणे महिलांना सोन्याची आवड असते अशी मान्यता असणाऱ्या कालावधीमध्ये बप्पीदा अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सोन्याचे मोठ्या आकाराचे दागिने घालून यायचे.
-
याच सोन्यावरील प्रेमाबद्दल एका मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलं होतं. तुम्ही एवढे सोन्याचे दागिने का घालता? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला तेव्हा त्यांनी याबद्दल खुलासा केलेला.
-
एवढं सोनं का घालता यावर उत्तर देताना बप्पीदा म्हणाले होते, “हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेसली हा माझा आवडता कलाकार असून तो कायम गळ्यात सोनसाखळी घालतो.”
-
“एल्विस प्रेसलीला पाहून मला कायम प्रेरणा मिळत राहिली. इतकंच नाही तर, जर मी जीवनात यशस्वी झालो तर माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असं ठरवलं होतं. त्यातच मला असं वाटतं की सोनं माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोन्याचे दागिने घालतो,” असं स्पष्टीकरण बप्पीदांनी दिलं होतं.
-
इतकच नाही तर पुढे बोलताना बप्पीदांनी, “गाण्यासोबत सोनं ही माझी वेगळी ओळख झाली आहे,” असंही सांगितलं होतं.
-
अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेस्ली आवडत असल्याने त्यांनी या रॉकस्टारला अनेक प्रसंगी सोन्याची साखळी आणि सोनेरी रंगाचा पोशाख घातल्याचं बप्पीदांनी बघितलं होतं.
-
त्याची ही अनोखी स्टाइल बप्पी लहरी यांना आवडली आणि त्यांनीही आपल्या स्टाइलमध्ये सोन्याचे कपडे घालायला सुरुवात केली.
-
यावरुनच बप्पी लाहिरींना सोन्याची किती आवड होती हे स्पष्ट होतंय. दागिणे घालणं हे त्यांच्या लूक्सचं आणि खास शैलीचा भाग झालं होतं.
-
बप्पी लहरी यांना भारताचा गोल्ड मॅन देखील म्हटले जायचे.
-
आता बप्पीदांकडे किती सोनं होतं याबद्दल बोलायचं झालं तर त्याचा खुलासा त्यांनी एका राजकीय कारणासाठी केलेला.
-
गाणं आणि क्रिकेटबरोबरच बप्पीदांना राजकारणाचीही विशेष आवड होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले होते. त्यानिमित्ताने त्यांच्या संपत्तीचा, सोने-चांदीचा तपशील समोर आला होता.
-
सध्या बॉलिवूड लाइफने जुन्या आकडेवारीच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी म्हणजेच २०१४ मध्ये बप्पीदांकडे एकूण ७५२ ग्रॅम सोने होते.
-
याशिवाय बप्पीदांकडे ४.६२ किलो चांदी होती. फक्त बप्पीदाच नाही तर त्यांची पत्नी चित्रांशी देखील दागिन्यांची शौकीन आहेत.
-
२०१४ मध्ये बप्पीदांच्या पत्नीकडे ९६७ ग्रॅम सोने, ८.९ किलो चांदी आणि ४ लाख किंमतीहून अधिकचे हिरे होते.
-
बप्पी लाहिरी मुंबईत २००१ मध्ये खरेदी केलेल्या आलिशान घरात राहत होते. त्यांच्या घराची किंमत सुमारे ३.५ कोटी रुपये आहे.
-
बप्पीदांना सुरुवातीपासून सोन्याबरोबरच गाड्यांचीही फार आवड होती. ते बीएमडब्ल्यू, ऑडी, टेस्ला एक्स आणि आणखी काही लक्झरी कार्सचे मालक होते.
-
बप्पीदांकडे असणाऱ्या या आलीशान गाड्यांची एकूण किंमत ५५ लाखांहून अधिक होती.
-
बप्पीदांकडील ७५२ ग्रॅम सोन्याची किंमत आजच्या दरानुसार १७ लाखांहूनही अधिक आहे.
-
तर आजच्या चांदीच्या दरानुसार बप्पीदांकडील चांदीची किंमत ही २ लाख ९१ हजार इतकी आहे.
-
बप्पीदांची एकूण संपत्ती २२ कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर आलीय. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)
Photos: सोन्याच्या दागिन्यांवरील प्रेम, आलिशान गाड्या, मुंबईतील घर अन; ‘गोल्डन मॅन’ बप्पीदांची एकूण संपत्ती किती?
बप्पीदा एवढं सोनं का घालायचे? त्यांच्याकडे एकूण किती सोनं होतं? त्याची किंमत किती? त्यांची एकूण संपत्ती किती आहे यावर टाकलेली नजर…
Web Title: Bappi lahiri net worth cars houses gold collection price scsg