-
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक यांची वयाच्या ६६ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती अनुपम खेर यांनी दिली.
-
सतीश कौशिक यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते लेखन, दिग्दर्शन, निर्मिती या क्षेत्रांमध्येही कार्यरत होते हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.
-
१३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी दिल्ली येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
-
अभिनयाची आवड त्यांना लहानपणापासून होती. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश मिळवला.
-
एनएसडीमध्ये असताना अनेक नामंवत कलाकारांशी सतीश कौशिक यांची ओळख झाली. या कलाकारांसह त्यांनी अनेक दर्जदार नाटकांमध्ये काम केले.
-
कुंदन शर्मा दिग्दर्शित ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे नाव ‘अशोक’ असे होते.
-
पुढील काही वर्ष त्यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या विनोदी पात्रांची लोकप्रियता हळूहळू वाढू लागली.
-
पण त्यांना मोठा ब्रेक १९८७ मध्ये ‘मिस्टर इंडिया’च्या रुपात मिळाला.
-
शेखर कपूर दिग्दर्शित या सुपरहिट चित्रपटामध्ये अनिल कपूर आणि श्रीदेवी प्रमुख भूमिकेमध्ये होते.
-
‘मिस्टर इंडिया’मध्ये सतिश कौशिक यांनी ‘कॅलेंडर’ ही व्यक्तिरेखा साकारली होती.
-
प्रेक्षकांना मिस्टर इंडियाचा मित्र कॅलेंडर खूप आवडला. सतिश कौशिक यांच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यांनी बरेचसे पुरस्कार देखील मिळाले.
-
कॅलेंडरला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर सतीश कौशिक यांनी साकारलेल्या अन्य भूमिका देखील लोकांना आवडू लागल्या.
-
पुढे त्यांनी अनिल कपूर यांच्यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
-
त्यांनी असंख्य चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका केल्या आहेत. प्रेक्षक त्यांना कॅलेंडर (मिस्टर इंडिया), पप्पू पेजर (दिवाना मस्ताना), चंदा मामा (मिस्टर अँड मिसेस खिलाडी), मुथ्थु स्वामी (साजन चले ससुराल), काशीराम (राम लखन), बाटा भाई (डबल धमाल) अशा त्यांच्या भूमिकांमुळे ओळखतात.
-
गोविंदाबरोबर त्यांची खास गट्टी जमली. नव्वदीच्या काळात गोविंदाच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये सतीश कौशिक झळकले होते.
-
अभिनयासह त्यांनी इतर क्षेत्रांमध्येही काम केले. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘तेरे नाम’ खूप गाजला. या सुपरहिट चित्रपटामुळे सलमान खानला नवसंजीवनी मिळाली असे म्हटले जाते.
-
सतीश कौशिक यांनी वेब माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘Scam 1992’, ‘कर्म युद्ध’ अशा काही वेब सीरिजमध्ये त्यांनी उत्तमोत्तम व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
-
कंगना रणौतचा ‘एमर्जन्सी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात ते ‘जगजीवन राम’ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. (फोटो सौजन्य – सतीश कौशिक Instagram आणि इंडियन एक्सप्रेस)
‘मिस्टर इंडिया’मधील कॅलेंडर ते ‘डबल धमाल’चा बाटा भाई; सतीश कौशिक यांनी साकारलेल्या अजरामर भूमिका
सतीश कौशिक यांनी बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी साकारलेल्या अनेक विनोदी भूमिकांमुळे प्रेक्षकांचे आजही मनोरंजन होते.
Web Title: Satish kaushik passes away iconic characters played satish kaushik yps